शिधापत्रिकाधारकांना मिळणार १०० रुपयात किराणा माल
मुंबई : सामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी सणासाठी राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांचा किराणा माल देण्याचा निर्णय घेतला आहे. या शंभर रुपयाच्या पाकिटात एक किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी मसूर असेल. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने हा प्रस्ताव आणला आहे.
यासंदर्भात जारी निवेदनात म्हटले आहे की, राज्यात 1.70 कोटी कुटुंबे किंवा सात कोटी लोकांकडे राशन कार्डची (Ration card) सुविधा आहे. ते सरकारी राशन दुकानातून धान्य खरेदी करण्यास पात्र आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक किंमत निर्देशांकानुसार देशाचा किरकोळ महागाई दर सात टक्के आहे. या पार्श्वभूमीवर सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तू देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किराणा मालाचे पॅकेज वापरून दिवाळीसाठी फराळ आणि मिठाई तयार करण्यास मदत होणार आहे.