डाव्या माध्यमांवर ‘५जी’ प्रहार

03 Oct 2022 13:58:12
डाव्यांच्या वर्चस्वामुळे माध्यमांत काम करु न शकणारी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा जपणारी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मंडळीही माध्यमांत ‘५जी’मुळे हव्या त्या ठिकाणाहून काम करु शकतील. ‘५जी’ तंत्रज्ञानामुळे त्यांनी केलेेले काम पूर्वीपेक्षा अधिक लोकांपर्यंत, अधिक वेगाने पोहोचेल. ‘५जी’ तंत्रज्ञानाची सुरुवात डावा विचार नामशेष होण्यात साहाय्यक ठरेल, त्याचे स्वागत.
 
 
5g
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिलेल्या ‘न्यू इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने भारत वेगाने घोडदौड करत आहे. आज तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत भारत कोणाहीपेक्षा कमी नाही. त्याचीच प्रचिती शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरसंचार क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणार्या ‘५जी’ सेवेच्या शुभारंभप्रसंगी आली. ‘५जी’ सेवेची सुरुवात सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये करण्यात आली असून त्यानंतर यंदाच्या दिवाळीपासून देशातील आणखी १२ शहरांमध्ये त्याची सुरुवात होईल.
त्यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगढ, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनौ आणि पुण्याचा समावेश आहे. त्यानंतर अन्य शहरांतही हळूहळू ‘५जी’ सेवा विस्तारेल व येत्या दोन वर्षांत ती संपूर्ण देशभरात उपलब्ध असेल. ‘५जी’ सेवेमुळे ग्राहकांना उत्तम ‘कॉल अॅण्ड कनेक्टिव्हिटी’ची सुविधा मिळेल. इंटरनेट वापरकर्ते चुटकीसरशी चित्रपट आणि अन्य सामग्री ‘डाऊनलोड’ करु शकतील.
 
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, ‘मल्टिमीडिया’ आदी उच्च दर्जाचे दिसेल. ५जी सेवेमुळे कृषी, शिक्षण, आरोग्य, परिवहन, दळणवळण व्यवस्थापन, आदी क्षेत्रांत क्रांती येऊ शकेल. तसेच ‘५जी’ तंत्रज्ञानाद्वारे विनाचालक कारही प्रत्यक्षात येऊ शकेल. ‘५जी’ तंत्रज्ञान आरोग्य, ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’, ‘क्लाऊड गेमिंग’साठीही आशेचा किरण ठरु शकेल. ‘४जी’मुळे ‘अॅलेक्सा’ व ‘गुगल होम’सारखे तंत्रज्ञान सामान्य होत असून ‘५जी’मुळे त्यांच्या वापरात मोठी वाढ होईल, तसेच याप्रकारचे तंत्रज्ञान इतर कंपन्याही पुरवू शकतील. याव्यतिरिक्त बाजारात सुरक्षेशी संबंधित नव्या यंत्रणाही समोर येऊ शकतील.
 
‘गेमिंग’ क्षेत्रात नव्या शक्यता तयार होऊ शकतील. वैद्यकीय क्षेत्रात रोबोटद्वारे शस्त्रक्रियेच्या तंत्राला सोपे केले जाऊ शकते. म्हणजेच, या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध झाल्यास आजचे सामान्य मानवी जीवन कैक पटींनी बदलेल. इतकेच नव्हे, तर नवनव्या शक्यतांनुसार नवनव्या रोजगारसंधीही तयार होतील.
 
नरेंद्र मोदींनी भारताच्या डिजिटलायझेशनसाठी संबंधित ‘डिव्हाईस’ची किंमत, ‘कनेक्टिव्हिटी’, ‘डेटा’ची किंमत आणि ‘डिजिटल फर्स्ट’चा विचार, या चार स्तंभांवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल, असे म्हटले होते. त्यानुसारच ‘डिजिटल इंडिया’चा प्रवास सुरु असून ‘५जी’ सेवेची सुरुवात त्यातलाच एक टप्पा. मात्र, ‘५जी’मुळे काय होईल, या प्रश्नाच्या उत्तरादाखल माध्यमक्षेत्रात प्रचंड बदल घडतील, असे अनेक तज्ज्ञ सांगताना दिसतात. म्हणजेच, ‘५जी’सेवेमुळे माध्यमविश्वावर मोठा परिणाम होईल. माध्यमांत साहित्य, वृत्तपत्रे, संकेतस्थळे, गीत-संगीत, चित्रपट, वेब सीरिज, दूरचित्रवाणी, ‘अॅनिमेशन’, ‘गेमिंग’ अशा सर्वांचाच समावेश होतो.
 
त्यात काय काय होईल, याबाबतची वरवरची माहिती समोर येत आहे, पण ‘५जी’मुळे माध्यमक्षेत्रातली प्रस्थापित डाव्या विचारसरणीवाल्यांची मिरासदारी संपून जाईल, हा यातला मोठा बदल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सत्तेवर काँग्रेसने ताबा मिळवला तर शिक्षण व माध्यमक्षेत्रावर सत्ताधार्यांच्या पाठिंब्याने डाव्यांनी वर्चस्व निर्माण केले. शिक्षणक्षेत्रातील वर्चस्वामुळे विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासाची, संस्कृतीची सखोल माहिती मिळण्याऐवजी ते मुस्लीम आक्रमकांवरील धड्यांनाच इथला इतिहास समजू लागले. त्यातूनच देशीपणाशी नाळ तुटलेली पिढी तयार होऊ लागली.
 
ती पिढी पुन्हा आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्यासारखेच करु लागली. त्यातूनच शिक्षण घेतलेली, डाव्या विचारांवर पोसलेली मंडळीच माध्यमक्षेत्राच्या सर्व प्रकारातही बसली. डावे टोळीवाले स्वतःला कितीही पुरोगामी, उदारमतवादी, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते वगैरे म्हणवून घेत असले, तरी ते तसे कधीही नसतात. म्हणूनच आपल्याविरोधी विचाराचा कोणी असेल तर डावे टोळीवाले त्याला कधीच सहन करत नाहीत. डाव्या विचारांच्या विरोधातला विचार वर उल्लेख केलेल्या माध्यमांच्या सर्वच प्रकारांतून समोर येऊ शकतो. कोणी भारतीय इतिहासाला, भारतीय संस्कृतीला, हिंदुत्वाला, राष्ट्रवादाला गौरवान्वित करणारी कथा, कादंबरी, इतिहासलेखन करू शकते, तर कोणी तसे वृत्तमाध्यम चालवू शकते, तर कोणी तसे चित्रपट, वेब सिरीज तयार करु शकते.
 
पण, इतकी वर्षे माध्यमक्षेत्रात डाव्यांचेच वर्चस्व असल्याने त्यांना विरोधी वाटणार्या विचारांच्या लोकांना कधी पुरेशी संधीच मिळाली नाही. त्यांना प्रत्येकवेळी डावलले गेले, अभिव्यक्त होण्यापासून ते पुरस्कारापर्यंत... म्हणूनच माध्यमक्षेत्रात डाव्या विचारांच्या लोकांचा सुळसुळाट झाल्याचे कित्येक वर्षे पाहायला मिळाले. कारण, डावे असलो तरच संधी मिळेल, असे वातावरण तयार करण्यात आले होते. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यात बदल घडू लागला.
 
समाजमाध्यमांच्या आगमनाने डाव्यांची माध्यमांतली मक्तेदारी संपू लागली. इतकी वर्षे भिन्न विचारांना अभिव्यक्त होण्याची संधी नाकारणार्यांना वाचणारे, पाहणारे मिळणेही मुश्कील झाले. कारण, माध्यमे आपल्या ताब्यात असल्याच्या जोरावर जे नाही ते दाखवण्याचा उद्योग करणार्यांची असलियत समाजमाध्यमांमुळे चव्हाट्यावर आली. चालू वर्षीच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ आणि अन्य चित्रपटांना मिळालेल्या प्रतिसादातून ते सोदाहरण दिसलेही.
 
काश्मीर खोर्यातील हिंदूवरील अन्याय-अत्याचाराला कोणीही मोठ्या पडद्यावर दाखवले नव्हते, ते ‘द काश्मीर फाईल्स’ने केले तर या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. डाव्यांनी व डाव्यांच्या ताब्यातल्या मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी नाकारलेल्या आणि १५ ते २५ कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने समाजमाध्यमांत समर्थनासाठी अभिव्यक्त झालेल्यांमुळे तब्बल ३४० कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला.
 
तर त्याआधी आणि त्यानंतर आलेल्या अनेक चित्रपटांना केलेला खर्चही वसुल करता आला नाही. आता ‘५जी’सारखे तंत्रज्ञान सर्व देशभरात सुरु झाल्यानंतर ते सर्वसामान्यांपासून माध्यमक्षेत्रात काम करु इच्छिणार्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल. त्याची पोहोच नसल्याने डाव्यांच्या वर्चस्वामुळे माध्यमांत काम करु न शकणारी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा जपणारी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मंडळीही माध्यमांत हव्या त्या ठिकाणाहून काम करु शकतील. ‘५जी’ तंत्रज्ञानामुळे त्यांनी केलेेले काम पूर्वीपेक्षा अधिक लोकांपर्यंत, अधिक वेगाने पोहोचेल.‘५जी’ तंत्रज्ञानाची सुरुवात डावा विचार नामशेष होण्यात साहाय्यक ठरेल, त्याचे स्वागत.
Powered By Sangraha 9.0