नवी दिल्ल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना आनंदाची बातमी मिळालेली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG Price) दरात 32.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. घरगुती सिलेंडर आहे त्याच दराने उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान, नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल.
नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
दरम्यान, महिन्याच्या सुरूवातीलाच नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट इतका होता.