रोजगार-व्यवसाय आणि व्यक्तिमत्त्व विकास

07 Jan 2022 14:01:54
नोकरी असो वा व्यवसाय, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यावर निश्चितपणे प्रभाव पडतो. अनेकांचे तर यशापयश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यासाठी अर्थातच आवश्यक असते ते व्यक्तिमत्त्व व्यवस्थापन व त्याचा विकास. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते.
 
PERSONALITY DEVELOPMENT
 
शिक्षणानंतर आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यावरील प्रत्येकासाठी महत्त्वाची बाब असते, ती नोकरी वा व्यवसायाची निवड करण्याची. या निवडीसाठी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, प्रयत्न, योग्यता, पूर्वतयारी यांचे नियोजन फार आवश्यक असते. त्यालाच जर नोकरी रोजगार वा उद्योग-व्यवसायाच्या गरजेनुरुप व विचारपूर्वक नियोजनाची जोड दिली, तर ते अधिक उपयुक्त ठरते. अर्थात, यासाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा व समान मुद्दा म्हणजे करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकास!व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रता व संबंधित विषयाच्या ज्ञान आणि अनुभवाला व्यक्तिमत्त्व विकासाची जोड दिली, तर आपण स्पर्धेवर मात तर करु शकतोच. त्याशिवाय आपापल्यापरीने निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. स्पर्धेच्या संदर्भात सर्वमान्य बाब म्हणजे व्यक्तीचा व्यक्तिमत्त्व विकास हा कुठल्या शिक्षण संस्थेत वा अभ्यासक्रमाद्वारा शिकविण्यात येत नसले, तरी ते आत्मसात केले जाऊ शकते.
 
व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, त्याची वैचारिक क्षमता, संवादक्षमता, आत्मविश्वास, भावनिक स्तर, प्रतिक्रिया, निर्णयक्षमता, नेतृत्वशैली इत्यादीचे परिचायक असते. व्यक्तीचा रोजगार असो वा उद्योग-व्यवसाय, त्याला संबंधितांचे व्यक्तिमत्त्व निश्चितच पूरक ठरते. त्यामुळेच नोकरी-रोजगारामध्ये विशेषत: अधिकारी वा जबाबदारीच्या पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, संबंधित कामाचा अनुभव इत्यादीच्या जोडीलाच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विषयक मुद्द्यांचा ‘आवश्यक बाबी’ म्हणून अवश्य उल्लेख केला जातो, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.नोकरी असो वा व्यवसाय, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यावर निश्चितपणे प्रभाव पडतो.
 
अनेकांचे तर यशापयश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यासाठी अर्थातच आवश्यक असते ते व्यक्तिमत्त्व व्यवस्थापन व त्याचा विकास. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते.अगदी सुरुवातीच्या टप्प्याच्या संदर्भात सांगायचे झाल्यास पदविका-पदवी स्तरावरील शिक्षण- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार व व्यवसाय हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी कुठला पर्याय स्वीकारावा, याचा विचार करताना केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता त्याला प्रशिक्षण-मार्गदर्शनाची जोड देणे हे संंबंधित उमेदवारासाठी फायदेशीर ठरते.
 
यासाठी आपल्या शिक्षणाला कुठल्या प्रकारच्या विशेष व अद्ययावत माहितीपर मार्गदर्शनाची जोड द्यायला हवी ते पडताळून पाहायला हवे. त्याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. उदाहरणार्थ, कला क्षेत्रात विशिष्ट भाषेचे वा विदेशी भाषेचे विशेष ज्ञान, वाणिज्य क्षेत्रात संगणकीय व्यवहार व करव्यवस्थापन, विज्ञान क्षेत्रात पर्यावरण संरक्षण-व्यवस्थापन इत्यादीचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
 
यातूनच उमेदवारांना रोजगार वा स्वयंरोजगार व्यवसायाचा पर्याय उपलब्ध होईल. या पर्यायानुरुप सुरुवातीच्या काळात विद्यार्थी-उमेदवारांना मार्गदर्शनाच्या जोडीलाच आत्मविश्वास मिळेल. त्यामुळे अधिकाधिक माहिती करुन घ्या. उपलब्ध मार्गदर्शनाचा लाभ वेळेत घ्यावा. आपल्या जीवनाचे खर्‍या अर्थाने शिल्पकार होण्याचा प्रयत्न फायदेशीर ठरु शकतो.शिक्षण-प्रशिक्षण व माहितीच्या जोडीला समुपदेशनाची जोड मिळाली, तर विद्यार्थी-उमेदवार व त्यांच्या पालकांसाठीही ते फायदेशीर ठरेल. ज्ञान-शिक्षण व उद्योजकता याची सध्याची प्रगत अवस्था लक्षात घेता असे करणे आवश्यक पण ठरते. आज अनेक व्यक्ती व संस्था समुपदेशनाद्वारे विद्यार्थी व नवागतांना त्यांच्या गरजांनुसार सल्ला देण्याचे काम करतात. व्यावसायिक शैक्षणिक संस्था व विषय तज्ज्ञांशिवाय काही महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सुद्धा असे उपक्रम सुरु आहेत. यातूनच त्यांना नेमके व आवश्यक असे मार्गदर्शन तर मिळते व यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
 
व्यक्ती आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ही संपूर्णत: वैयक्तिक बाब ठरते. हे तत्त्व नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात समान स्वरुपात लागू होते. व्यक्तिमत्त्वामध्ये संबंधित व्यक्तीचे प्रयत्न, सातत्य, काम करण्याची शैली व पद्धती, स्वभाव, निर्णयक्षमता, संवादकला, आत्मविश्वास, विश्लेषक प्रवृत्ती इत्यादीचा प्रामुख्याने समावेश होतो. या सार्‍या बाबी व्यक्तिगत स्वरुपाच्या असल्या तरी त्यांच्या नोकरी-रोजगाराच्या संदर्भात त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम अवश्य होतो. कर्मचार्‍याच्या कामाचे मोजमाप याच आधारे अपरिहार्यपणे होत असे.नोकरी-रोजगाराला आपल्या उमेदीच्या काळात सुरुवात केल्यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळे व सकारात्मक वळण मिळते. मात्र, त्यामध्ये भर घालून आपला व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आपल्यालाच आपले प्रयत्न सातत्याने करावे लागतात, हे विसरुन चालणार नाही. या प्रयत्नांमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेला कार्यक्षमतेची जोड देणे, आपल्या शिक्षणाची नोकरी-कामकाजाशी सांगड घालणे, आपल्या कामात स्वत:चे नैपुण्य प्राप्त करणे, विश्वासासह काम करणे, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मपरिक्षण करणे व कठिण प्रसंगी पण, निराश न होता आत्मविश्वासासह प्रयत्न करणारे कर्मचारी वा व्यक्ती यांचा व्यक्तिमत्त्व विकास निश्चितपणे साधला जातो.
 
व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे हे पैलू उद्योजक वा व्यावसायिक यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भात तेवढाच लागू ठरतो. स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करुन त्यामध्ये वाढत्या स्पर्धेवर मात करुन यशस्वी व्हायचे असेल, तर नवागत उद्योजकाजवळ आपल्या ज्ञान आणि अनुभवाची उद्योग प्रक्रियेशी नेमकी सांगड घालणे, व्यवसायाच्या गरजांनुरुप स्वत:च्या स्वभावाची आखणी करणे, व्यवस्थापनाला वैचारिक अधिष्ठान देणे, प्रत्यक्ष काम करण्यापासून थेट नेतृत्व करण्याची क्षमता असणे, निष्ठा व आत्मविश्वास, सहकार्‍यांसह सहकार्‍यांनी सौहार्दपूर्ण संबंध व्यवसायाच्या संदर्भात सर्वसमावेशक प्रयत्न यामुळे व्यवसाय करणार्‍यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधून त्याचा व्यावसायिक लाभ त्यांना अवश्य होतो.
रोजगार असो वा स्वयंरोजगार, व्यक्ती असो अथवा व्यवसाय, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा चेहरा, पोशाख व संभाषण या तीन मुद्द्यांचा अवश्य समावेश असतो. यालाच व्यवस्थापन संदर्भात ’'Fda' ’ म्हणजेच ‘Face Dress Address’ अशी संज्ञा दिली जाऊ शकते. याठिकाणी व्यक्तीचा चेहरा म्हणजे सुंदरता नव्हे, तर आत्मविश्वास, पोशाख म्हणजे सर्वोत्तम नव्हे, प्रासंगिक कपडे व भाषण म्हणजे वक्तृत्व नव्हे, तर कार्यकर्तृत्वावर आधारित बोलणे-चालणे या बाबींचा समावेश होतो. या तीनही बाबी व्यावहारिक व व्यक्तीशी संबंधित असून रोजगार - स्वयंरोजगार करणार्‍यांशी संबंधित असून प्रयत्न केल्यास सहजसाध्य आहेत. मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न करणे मात्र गरजेचे!
 
व्यक्तिगत नोकरी-रोजगार वा उद्योग-व्यवसाय याला व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्व विकासाची म्हणजेच त्यांच्या विकसित व्यक्तिमत्त्वाची जोड मिळाली, तर निश्चिपणे प्रगती होऊ शकते. कामकाजाचे तंत्रज्ञान, विकसित कार्यपद्धती, उत्पादनांमध्ये सुधारणा, विकसित कामकाज प्रक्रिया या बाबी व्यक्तिगत कामकाज वा नोकरी-व्यवसाय या दोन्ही संदर्भात समान असतात. त्यामध्ये गुणात्मक व दर्जात्मक स्वरुपात फरक पडू शकतो, तो संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासामुळे. व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणुकीला व्यक्तिमत्त्व विकासाची जोड देणे का, कसे आणि किती महत्त्वपूर्ण ठरते, हेच यावरुन अधोरेखित होते. व्यवस्थापनातील व्यवस्थापकांपासून व्यवसायातील व्यावसायिकांपर्यंत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे व त्याची जपणूक करणे म्हणूनच काळाची गरज ठरते.
 
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन व सल्लागार आहेत.)
Powered By Sangraha 9.0