मुंबई : भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स ही देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी बनली आहे. टाटा मोटर्सने वाहन विक्रीमध्ये दक्षिण कोरियन हुंडाईला मागे टाकले आहे. गेल्या महिन्यात टाटाच्या ३५,३०० वाहनांची विक्री झाली, तर त्याच कालावधीमध्ये हुंडाईच्या एकूण ३२,३१२ वाहनांची विक्री झाली. तसेच, दशकांमध्ये पहिल्यांदाच भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे टाटाची एसयूवी नेक्सऑन ही कार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तब्बल ९९,००२ वाहनांची विक्री केली. विक्रीच्या बाबतीत टाटाने सर्व वाहन निर्मिती कंपन्यांना मागे टाकले आहे. टाटा मोटार्स ही आता भारतातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी बनली आहे. डिसेंबरच्या २०२१चा कार विक्रीचा अहवाल प्रसिद्ध झाला. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही स्वस्तात मस्त कार सादर करून या विभागात क्रमांक १ कायम राखला आहे.
टाटा मोटर्सने केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ घातला. ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस उतरून दुसरीकडे गुंतवणूकदारांनाही मालामाल केले. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. डिसेंबर महिन्यात टाटाने एकूण ३५ हजार २९९ कारची विक्री केली. यापैकी २ हजार २५५ इलेक्ट्रिक कार आहेत. आताच्या घडीला टाटा मोटर्सच्या टाटा नेक्सऑन ईव्ही आणि टाटा टीगॉर ईव्ही या दोन कार इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध आहेत.