पुणे - कोरोना आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलतांना ते म्हणाले,'राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा सध्या सुरु आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी चर्चा झाल्याचे वृत्त काहींनी दिले होते मात्र, हे वृत्त साफ खोटे आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.
राज्यात त्याबाबत चर्चाही नाही. आणि तसा कोणता निर्णयही झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे अजित पवार यांनी म्हटले.'
दरम्यान, राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांशी बोलतांना आपलं मत स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले,' आतापर्यंत सर्व निर्णय डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा पॅन्डेमिक संपलेलं आहे असं कुठेही सांगितलेलं नाहीये. आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत असले तरी ओमायक्रॉन किंवा कुठलाही व्हेरिएंट हा वीक किंवा स्ट्राँग आहे, व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल तर आतापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.' असं म्हणत त्यांनी राज्यातील मास्कची सक्ती हटवली जाणार नाहीये हे स्पष्ट केले आहे.