ईशान्य भारतातील थोर स्वातंत्र्यसेनानी, नागा संस्कृतीच्या मूळावर उठलेल्या ब्रिटिशांशी धैर्याने आणि समाजाला संघटित करुन संघर्ष करणाऱ्या राणी गाईदिन्ल्यू माँ यांची आज जयंती. तेव्हा राणी गाईदिन्ल्यू यांच्या जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या वीरांगनेच्या शौर्यगाथेचा आढावा घेणारा हा लेख...
१५ ऑगस्ट, २०२१ रोजी भारताच्या ‘स्वातंत्र्य दिनी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना लालकिल्याच्या प्राचीवरून वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई, चेन्नमा व ईशान्य भारतातील मणिणूरच्या राणी गाईदिन्ल्यू माँचाउल्लेख केला व माझ्यासकट सर्व ईशान्य भारत आनंदित झाला. राणी गाईदिन्ल्यू माँचे नाव ऐकले व मन प्रफुल्लित झाले. वीररस निर्माण झाला.एका विस्मरणात गेलेल्या रणरागिणीच्या नावाचा उद्घोष भारताच्या पंतप्रधानांच्या भाषणात झाला. खूप आनंद झाला. ईशान्य भारत तसा दुर्लक्षित, परंतु मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर तिथे अनेक सुधारणा होत आहेत. हा पण महत्त्वाचा पैलू आहे व तेथील स्वातंत्र्य सेनानींचे देश स्वतंत्र करण्यात मोठे योगदान आहे, त्याचा उल्लेख होणे हा गौरव आहे.
लालकिल्ल्यावरून भारताच्या ‘स्वातंत्र्य दिनी’राणी गाईदिन्ल्यू माँचे नाव ऐकले व माझ्या ईशान्य भारतातील वास्तव्यातील क्षणांचा मनाने प्रवास सुरू करावयास प्रारंभ झाला. मन भूतकाळात रममाण झाले. सन १९८९ ते १९९३ पर्यंत मी मणिपूरमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचा प्रांत संघटन मंत्री म्हणून कार्यरत होतो. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे संघटन मंत्री स्व. भास्करावजी मणिपूर प्रवासात आले होते. त्यांनी मला सांगितले की, “सुहास, तू राणी गाईदिन्ल्यू माँच्या गावी जाऊन ये.” मी जाऊनही आलो आणि मन आनंदित झाले.
जिचे नाव फक्त आजवर ऐकले होते, त्या रणरागिणीला, आधुनिक दुर्गामातेच्या दर्शनाचे भाग्य लाभले. निमित्त होते राणी गाईदिन्ल्यू माँचे बंधु हैपोव जादोनांग यांचा फोटो वनवासी कल्याण आश्रम प्रकाशित करणार होता. हैपौव जादोनांग हे ब्रिटिशशासित भारतातल्या मणिपूर राज्यातील धार्मिक व राजकीय नेता होते. त्यांनी ‘हराक्का’ नावाचे धार्मिक आंदोलन सुरु केले व ब्रिटिश सरकार विरोधात जनआंदोलन केले. दि. २९ मार्च, १९३१ साली त्याला इंफाळच्या तुरुंगामध्येराजद्रोहाच्या आरोपाअंतर्गत फाशी देण्यात आली. इंग्रज ज्यांना फाशी देत, त्यांचे फोटो शिलाँगच्या सरकारी संग्रहालयात आजही उपलब्ध आहेत. परंतु, हैपौव जादोनांगचा फोटो सापडला नाही. राणी गाईदिन्ल्यू माँ ही जादोनांग यांची चुलत बहीण. तिने जादोनांग यांचे धर्मरक्षणाचे, इंग्रजांच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केले. तिला विचारले की, “जादोनांगसारखा दिसणारा माणूस दाखव.” तिने एक माणूस दाखविला होता. त्यावरून एक फोटो बनविला होता. तो घेऊन मी व माझ्याबरोबर भैय्याजी काणे यांच्या छात्रावासातून शिकलेला डीलींग कुबे होता. त्याला नागा भाषा व हिंदी, इंग्रजी भाषा येत होती. त्यामुळे संवाद करणे सोयीचे गेले.
स्वप्नात देवदूताचे आगमन
गाईदिन्ल्यूचा जन्म मणिपूर राज्यातील लुंकाऊ व्हिलेज तौसेम सब डिव्हिजन जिल्हा तामिंगलाँग येथे दि. २६ जानेवारी,१९१५ साली झाला. जन्माच्या काही दिवस अगोदर त्यांचे वडील लोथोनांक यांच्या स्वप्नात देवदूत आला व तो म्हणाला, “तुझ्या घरी मुलीचा जन्म होईल व ती तुमचे दुःख, कष्ट, दूर करील.” गावच्या प्रमुखांनी मुलीचे नाव ‘गाईदिन्ल्यू’ ठेवले. याचा अर्थ ’चांगला मार्ग दाखवणारी.’ आध्यात्मिक व्यक्तित्व. लहानपणापासून धार्मिकतेकडे तिचे आकर्षण होते.
रात्री आकाशातील चंद्राकडे टक लावून बघून गाईदिन्ल्यू ध्यानस्थ व्हायची. लोकांचा विश्वास होता हिच्यामध्येदैवीशक्तीचा निवास आहे. लोक तिला ’चेरचानदिन्ल्यू’ म्हणजे देवी दुर्गेचा अवतार मानत होते. त्यांची मान्यता होती की, गाईदिन्ल्यूने स्पर्श केलेले पाणी प्यायले की, आजार बरा होतो. दुरून दुरुन लोक गाईदिन्ल्यूने स्पर्श केलेले पाणी घेण्यासाठी येत असत. मान्यता होती की, साक्षात परमेश्वराने तिला दर्शन दिले होते. देवीच्या आदेशानुसार ती व तिच्या अनुयायांनी भुवन पहाडाच्या चार धार्मिक यात्रा केल्या होत्या. देवीने सांगितले होते की, “भुवनपहाडीवर विष्णू गुफा तिच्या कार्याचा केंद्रबिंदू असणार आहे. तेथेच विष्णू भगवानचे मंदिर आहे. स्थानीय भाषेत ’लिंगवान’ म्हणतात. जादोनांगचीभेट व स्वतंत्रता आंदोलन गाईदिन्ल्यू जादोनांगच्याविचाराने प्रभावित झाली होती. जादोनांग तेव्हा इंग्रजांच्या विरोधात व सनातन धर्माचा प्रचारपण करत होते. १९२७ साली जादोनांगच्या भेटीनंतर जादोनांगचा मार्ग अवलंबला. आजन्म अविवाहित राहून समाजात धर्मजागरणाचे कार्य व नागा क्षेत्रातून ‘इंग्रज हटाव’ हे आंदोलन करण्याचे व्रत घेतले. राणी माँ व जादोनांगने नागा जनजातीच्या जेमी, रोंगमई, ल्यांगमईमध्ये एकात्मता होण्यासाठी ‘हरक्का आंदोलन’ चालवले. तिघांचे एकत्रित स्वरूप ’जेलियांगरांग’ हरक्का संघटन. ‘हरक्का’चा अर्थ शुद्ध. ‘हरक्का आंदोलन’ जेलियांगरांगना मिशनरींच्या प्रभावापासून दूर अथवा शुद्ध ठेवण्याचे आंदोलन होते.
इंग्रजांशी संघर्ष करण्यासाठी गाईदिन्ल्यूने सेना जमविली. ती इंग्रजांचे सामान वाहणे व घरपट्टी द्यायला विरोध करायची. मोठ्या संख्येत नागा युवक व युवती गाईदिन्ल्यूच्या सेनेत भरती झाले. लोकांना समजवायची की, केवळ इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य हिरावले नाही, तर त्यांच्या मदतीने चर्च नागा जनजातीला ख्रिस्ती बनवत होता.
भारत स्वतंत्र होण्याचे संकेत
त्याकाळी रेडिओ, वर्तमानपत्राची सोय नव्हती. दळणवळणाची साधने नव्हती. इंग्रज सरकार राणी गाईदिन्ल्यू व जादोनांगवर पहारा ठेवून होती. परंतु,गांधी-नेहरू हे आंदोलन करत आहेत, हे कळले होते. त्याबाबतीत राणी गाईदिन्ल्यू अनुयायांना म्हणाली, “आम्ही नागा जनजातीने सदैव स्वतंत्र राहिली आहे. आपण कुणाचीही गुलामगिरी स्वीकारली नाही, तर हजारो किलोमीटर दुरून आलेल्या या गोऱ्या लोकांना आमच्यावर राज्य करण्याचा अधिकार काय? आपण यांचा पूर्ण बहिष्कार करायचा आहे. त्यांना मान्यता द्यायची नाही. कोणताही टॅक्स द्यायचा नाही. कोणतेही कायदे मान्य करायचे नाही. त्यांचे सामान उचलायचे नाही. गावात त्यांना येऊन द्यायचे नाही.” असे कठोर निर्णय राणी घेत होती.
ब्रिटिश दमनचक्र
गाईदिन्ल्यूच्या आंदोलनाचे दोन भाग होते. एक जेलियांगरांग समाजात धर्मसुधारणा व दुसरा इंग्रजी शासनापासून मुक्ती इंग्रज सरकार अतिशय हुशारीने, परंतु तितक्याच खालच्या थराला जाऊन स्वातंत्र्य सैनिकांना बदनाम करायची. जादोनांगच्या फाशीनंतर जेलियांगरांग ‘हरक्का आंदोलन’ पूर्ण नागा पहाडी व उत्तर कछार जिल्ह्यात पसरले. इंग्रजांनी आपल्या रणनीतीप्रमाणे चार मणिपुरी व्यापाऱ्यांच्या हत्येचा आरोप लाऊन तिला ‘वॉन्टेड’ म्हणून घोषित केले. इंग्रजांनी ‘हरक्का’ धर्म पिशाच्च व सैतानाचा आहे व गाईदिन्ल्यू ही सैतानाची पुजारी आहे, ती माणसांचा बळी देते, ‘माणसाचे रक्त पिते, त्याची खोपडी खाते, असे अनेक खोटे आरोप लावले. तिला अपमानित करण्याचे सर्व प्रयत्न केले. कारण, हा छोट्या बालिकेला सोडू नका, हे ख्रिश्चन मिशनरी ब्रिटिश सरकारला सांगत होते.धर्मपरिवर्तनाच्या कामात व ब्रिटिश साम्राज्याला धोका आहे. हिला पकडून जेलमध्ये टाका. ब्रिटिश नीती ही ‘तोडा व फोडा व राज्य करा’ या न्यायाने वागत होती. गाईदिन्ल्यूची शक्ती वाढली होती.
गाईदिन्ल्यूने देशभक्ती गीते, भजने, रचली. आपल्या लढवय्या सैनिकांना शिकवली. गाईदिन्ल्यूला देवीरुपात लोक पुजू लागले. तिचं दर्शन व्हावे, ही सर्वांची इच्छा असायची. इंग्रज माहिती विचारायला आले की, गावकरी खोटी माहिती देऊन त्याला दुसऱ्या रस्त्याकडे पाठवून द्यायचे.
‘ऑपरेशन गाईदिन्ल्यू’
ख्रिश्चन बनल्यावर व्यक्तीची राष्ट्रीयता नष्ट होते. त्यातले अनेक लोक राष्ट्रद्रोह करू लागतात. कट्टर ख्रिश्चन डॉ. हराल व पुलोमीच्या ख्रिश्चन दोबसियांचे राष्ट्रविरोधी आचरण याचे प्रमाण आहे. डॉ. हराल घरभेदी निघाला. त्याने धर्मांतरीत झाल्यावर गाईदिन्ल्यूचा ठावठिकाणा इंग्रजांना दिला व त्यांनी गाईदिन्ल्यूला पकडले तो दिवस दि. १८ ऑक्टोबर, १९३२ होता. गाईदिन्ल्यूच्या प्रति संपूर्ण नागा समाजाचा भक्तिभाव होता. त्यावेळी सर्व नागा सनातन धर्मीय होते. जे स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेत होते. परंतु, एकदा कोणी नागा ख्रिश्चन झाला की, त्याला गाईदिन्ल्यू सनातन धर्म व स्वतंत्रता आंदोलनाप्रति घृणा निर्माण केली जात होती. हे काम चर्चमध्ये ख्रिश्चन पाद्री करत असत. हळूहळू नागा जनजातीची स्वतंत्रता कमी केली, त्यांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना ख्रिश्चन बनविले. त्यांची परंपरा, संस्कृती, रितीरिवाज, नृत्य सर्व भ्रष्ट केले.
स्वतंत्रता आंदोलन पुनःप्रारंभ
गाईदिन्ल्यूचे निष्ठावान कार्यकर्ता गुप्तपणे गाईदिन्ल्यूला भेटत होते. गाईदिन्ल्यू त्यांचे मनोबल वाढवीत होते. “माझ्या प्रिय नागा बंधूंनो, आपण स्वतंत्र होतो. स्वतंत्र राहू. गोरी कातडीवाले आमच्यावर राज्य करतील, हे आम्हाला स्वीकार नाही. ब्रिटिश सरकारला दंड तर काय, पण कर देणे पण स्वीकार्ह नाही. आमचा नागा समाज इंग्रजांच्या कायद्याला मानत नाही. इथले कायदे आम्ही बनवू. विदेशी लोकांना याचा अधिकार नाही. इंग्रज आपल्या देशात परत गेले पाहिजे. हे माझ्या प्रिय नागा वीर व वीरांगनांनो, संघर्ष करा. आपल्याला गुलाम बनविण्याचा परिणाम काय असतो, हे त्यांना कळू द्या. आपली नागा संस्कृती धोक्यात आहे. आपल्या धर्मावर व संस्कृतीवर प्रहार होत आहे. त्याची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे.”
जादोनांगच्या स्वतंत्रता आंदोलनावर प्रतिबंध
जादोनांगची फाशी दि. २९ ऑगस्ट १९३१ व गाईदिन्ल्यूची अटक दि. १८ ऑक्टोबर, १९३२ ला केल्यानंतर इंग्रजांनी जादोनांगचे स्वतंत्रता आंदोलन हे देशद्रोही आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंधित केले. त्यानंतर देखील अनुयायांनी आंदोलन केले.
पंडित जवाहरलाल नेहरु १२ दिवसांच्या प्रवासासाठी आसाममध्ये १९३७ साली गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, “मी आपल्या १२ दिवसांच्या प्रवासाचा विचार केला तेव्हा असे वाटले की, येथील यात्रा ही स्वप्नवत वाटते आहे आणि मी त्या गाईदिन्ल्यूच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा ती तर नागा ओंकी राणी आहे, जी आज काळकोठरीमध्ये बसली आहे. तिचे विचार किती उत्तम आहेत, तिच्या वेदना, तिचे स्वप्न, तिचे जीवन लक्ष्य किती उच्च कोटीचे आहे,” असे सांगून नेहरूंनी गाईदिन्ल्यूचे शौर्य व साहसाची प्रशंसा केली.
जून १९३८ मध्ये नेहरुंनी ब्रिटिश प्रभावशाली खासदार लेडी नैन्सी एस्टरला गाईदिन्ल्यूला सोडण्याचा आग्रह केला. परंतु, आसामचे ब्रिटिश सरकार गाईदिन्ल्यूला सोडायला तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, गाईदिन्ल्यूला सोडले तर मणिपूरचे नागाक्षेत्र, नागा हिल्स, उत्तर कछार हिल्स व मिकीर हिल्स येथील स्वातंत्र्य आंदोलन परत वर डोके काढेल. या कारणामुळे भारत सरकारचे सचिव (Secretary of State for india) ने रानी गाईदिन्ल्यूला तुरुंगातून सोडण्याचा आग्रह अमान्य केला. ब्रिटिश संसदेने गाईदिन्ल्यूला‘उत्तर पूर्व भारताची दहशत’ ही पदवी दिली. (Terror of Northeast Bharat). या नागा बालिकेचा त्याग भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण भारतवर्ष स्वातंत्र्यासाठी व्याकुळ झाले होते. त्यावेळी एक वीर नागा बालिका गाईदिन्ल्यू दोन महिने कोहिमा, पाच महिने इंफाळ, एक वर्ष गुवाहाटीत, सहा वर्षं शिलाँग, तीन वर्षं आईझोल (मिझोराम) व उर्वरीत काळ तुरा तुरुंगात राहून स्वातंत्र्य संग्रामात आहुती देत होती. पंडित नेहरु म्हणाले, “गाईदिन्ल्यू ही नागाओंकी रानी है।” तेव्हापासून ‘रानी गाईदिन्ल्यू माँ’ हा शब्द प्रचलित झाला.
स्वतंत्र भारतात राणी गाईदिन्ल्यूची कारावासातून सुटका
दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारतवर्ष स्वतंत्र झाले. जवळ जवळ १५ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर राणी गाईदिन्ल्यू माँला तुरुंगातून मुक्त करण्यात आले. आसाम सरकारने राणी गाईदिन्ल्यूला जेलियागरांग क्षेत्रात जाण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यावेळी आसाममध्ये भारतविरोधी वातावरण होते. चर्च तर हेच इच्छित होते की जेलियांगरांग समाजाचा शेष हिंदू समाजाशी संबंध येऊ नये आणि यात ते यशस्वी झाले. परंतु, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आसाम व मणिपूर सरकारला स्पष्ट निर्देश दिले की, “राणी गाईदिन्ल्यूला ताबाडतोब सोडा.” शेवटी विवश होऊन आसाम सरकार तयार झाली. परंतु, राणी गाईदिन्ल्यू अटी लावल्या की, मणिपूर, नागाहिल्स, उत्तर कछार, मिकीर हिल्स (कारबी आंग लाँग) व कछारमध्ये राहणारे जेमी, लियामई व रोगमई नागांच्यामध्ये जाऊ शकणार नाही. हा राणी गाईदिन्ल्यूवरती खूप मोठा अन्याय होता, जो स्वतंत्र भारतातील आसाम सरकारने केला. राणी गाईदिन्ल्यूला सन्मानित करण्याच्याऐवजी दंडित केले जात होते.
आसाम सरकारच्या या निर्णयाने राणी गाईदिन्ल्यू दुःखी झाली. पण, मनात ठरवले की, प्रथम तुरुंगातून बाहेर येऊ, नंतर पुढील मार्गक्रमण करू. ज्या देशासाठी सर्वस्व दिले, तिच्यावरच तिच्या देशभक्तीवर शंका घेऊन दहशती नेत्यांच्या पंक्तीत बसविले. याच्या पाठीमागे चर्चचेषड्यंत्र काम करत होते. १९५१ पर्यंत राणी गाईदिन्ल्यू नागा हिल्सच्या मोकोक्चुंग जिल्ह्यातील चांग गावात छोटाभाऊ खिऊनसिंग टवेनसांगच्या बरोबर राहू लागली. १९५३ ला पंडित जवाहरलाल नेहरू मणिपूर व आसाममध्ये आले. त्यांनाही जेलियांगरांग नागांच्या समस्या सांगितल्या व दूर करण्याचा आग्रह केला. त्यानंतर थोडी सुविधा मिळाली व आपले घर ठीक करण्यासाठी थोडे धन मिळाले. उपजीविकेसाठीथोडे पेन्शन मिळू लागले. ‘स्वातंत्र्य सेनानी’ हा दर्जा मिळाला. राणी गाईदिन्ल्यूला दुसऱ्यांदा भूमिगत व्हावे लागले. फिजोच्या नेतृत्त्वाखाली ‘नागा नॅशनल कौन्सिल’ने (NNC) नागालँडला भारतातून वेगळे करण्यासाठी उत्पात सुरू केला. चर्च व एनएनसी दोघे मिळून जेलियांगरांग व संसारी हिंदूंना साम, दाम, दंड, भेद वापरून ख्रिश्चन बनवीत होते. राणी गाईदिन्ल्यूला जीवे मारण्याची धमकी देत होते. परंतु, राणी माँने याची कधी परवा केली नाही. १९६१ ते १९६५ पर्यंत भूमिगत राहून आंदोलन चालवले.
भारत सरकार व राणी गाईदिन्ल्यू समझोता
दि. ५ व ६ जानेवारी, १९६६ ला सरकार व राणी माँ यांची चर्चा होऊन दि. १६ जानेवारी, १९६६ ला आत्मसमर्पण केले. राणी गाईदिन्ल्यूने घोषणा केली, “मी एक भारतीय नागरिक आहे. भारत देश आमचा आहे. मी हिंदू आहे व सनातन हिंदू धर्म आमचा आहे.” नागालँड सरकारने घोषणा केली की, जेलियांगरांग क्षेत्राचा विकास केला जाईल. नागालँड सरकारने कोहिमामध्ये राणी गाईदिन्ल्यूसाठी घराची सोय केली. तिला कमांडो, कर्मचारी दिले.
राणी गाईदिन्ल्यू माँचे शालेय शिक्षण झाले नव्हते. परंतु, देश व समाजाच्या सर्व गोष्टी त्यांना माहिती होत्या. राष्ट्रहिताच्या ज्या गोष्टी योग्य वाटायच्या, त्याची जीवाची पर्वा न करता ते काम ती पूर्णत्वास न्यायची. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई या पंतप्रधानांशी राणी गाईदिन्ल्यूचे चांगले संबंध होते.
जोरहाट येथे १९६९ साली हिंदू संमेलनात परमपूजनीय गुरुजी व राणी माँ यांची भेट झाली. आणीबाणी नंतर आसामच्या कारबी अंगलांग जिल्ह्यातील फुलोनी नामक ठिकाणी प.पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना भेटल्या व हरक्का हिंदू नागांच्या बाबतीत चर्चा केली. त्यानंतर गणमान्य लोकांना हरक्का संघटन व राणी माँच्या कार्याकडेलक्ष देण्यास सांगितले. राणी माँ अखिल भारतीय स्वतंत्रता सेनानी संघटनाच्या राष्ट्रीय पदाधिकारी होत्या. आदीमजाती सेवक संघ, भारत सेवाश्रम, रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम व विश्व हिंदू परिषद आदी संघटनांशी राणी माँचे आत्मीय संबंध होते. १९७८ साली डीमापूरला अ. भा. वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यात त्यांनी कल्याण आश्रमाची माहिती दिली व कार्य प्रारंभ झाले आहे, हे सांगितले व स्थानिक कार्यकर्ता जगदंब मलचा परिचय करून दिला. १९७८ साली श्रद्धेय रामभाऊ गोडबोले व वसंतराव भट दिमापूरला भेटले. वसंतराव भट कोहिमाला राणी माँच्या घरी जाऊन भेटले व कल्याण आश्रम आपल्या कार्यास मदत करेल, हे आश्वासन दिले.
दि. १७ फेब्रुवारी, १९९३ साली वयाच्या ७८व्या वर्षी गाईदिन्ल्यू अनंतात विलीन झाल्या. पाच दिवस जनतेच्या दर्शनासाठी पार्थिव ठेवले व दि. २१ फेब्रुवारी, १९९३ रोजी गावात अंतिम संस्कार केले. भारतमातेची ही वीरांगना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोणतेही लौकीक शिक्षण नसताना, आपला धर्म, संस्कृती, परंपरांच्या रक्षणासाठी इंग्रज व ख्रिश्चन मिशनरी,दहशतवादी यांच्या चहूबाजूंनी वेढ्यात सापडलेली. परंतु, तितक्याच शिताफीने धैर्याने मार्ग काढत शेवटपर्यंत संघर्ष करणाऱ्या वीरांगनेला कोटी कोटी प्रणाम! वनवासी कल्याण आश्रम व राणी गाईदिन्ल्यू माँ १९७९ पासून नागालँड, मणिपूरमध्ये एकत्र काम करून राणी माँच्या मनातील अनेक गोष्टी पूर्णत्वास नेल्या आणि पुढेही नेणार आहे. राणी माँचे यथोचित स्मारक तिच्या लुकाऊ गावी होत आहे, वर्तमान केंद्र सरकार व मणिपूर सरकार विकास कार्य उत्तम करत आहेत.
सुहास पाठक
(लेखक पश्चिम क्षेत्र शिक्षण आयाम प्रमुख आहेत.)
९४२१२५९३८६