नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत दोन गटांत जोरदार राडा, मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

21 Jan 2022 19:46:28
साक्री : राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल १९ रोजी जाहीर झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच ठिकठिकाणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याच दरम्यान धुळ्यातील साक्री येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. जल्लोष सुरू असताना दोन गटांत किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
 

Sakri11 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला. याच वेळी त्या परिसरातून शिवसेनेचे कार्यकर्ते बाईकने जात होते. त्या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत वाद झाला.
 
हा वाद इतका वाढला की नंतर दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. हा वाद सोडवण्यासाठी अनेकांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी जाधव या सुद्धा वाद सोडवण्यासाठी तेथे आल्या.
 
मोहिनी जाधव या वाद सोडवत असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी जाधव यांचा मृत्यू भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
 
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हा आरोप होत असला तरी, मोहिनी जाधव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल.
 
मयत मोहिनी जाधव यांच्या नातेवाईकांचे उपोषण 
 

Sakri1 
दरम्यान संपूर्ण साक्री शहरातील मोहिनी यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषण सुरु केले आहे. सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा देखील देण्यात आला.
 
संस्थांनी केली चौकशीची मागणी
 
दरम्यान केंद्रीय विमुक्त घुमंत समुदाय विकास आणि कल्याण बोर्ड नवी दिल्ली चे अध्यक्ष दादा इदाते यांनी या घटनेची चौकशी होण्याबाबत धुळे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे. याच प्रकारे भटके विमुक्त विकास परिषदेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी होण्याबाबतचे पत्र ई-मेल द्वारे पाठविले असून यात काही समाजकंटक या घटनेस जातीय रूप देऊन हिंदु समाजात कलह माजविण्याचा व दुही पसरविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा भटके विमुक्त विकास परीषद महाराष्ट्र प्रांत जाहीर निषेध करीत असुन या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असून गोंधळी समाज सेवा संघ यांनी देखील दोषींना कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0