शिरपूर पीपल्स बँकेच्या एटीएम लुटीचा प्रयत्न

18 Jan 2022 19:24:00
शिरपूर : शहरातील गजबजलेल्या मेन रोडवरील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम वर धाडसी दरोडा टाकून लूट करण्याचा प्रयत्न करण्यात एका दरोडेखोराला अपयश आले. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे व आरडाओरड केल्याने सदरच्या अनर्थ टळला आहे.
 
shirapur
 
याबाबत वृत्त असे की, बँकेत दरोडा टाकण्याचा उद्देशाने आलेल्या दरोडेखोराने बँकेच्या सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात चटणी (मिरची पावडर) फेकून लोखंडी हत्याराने डोक्यावर व हातावर वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. यात सिक्युरिटी गार्डला डोक्यात व हातावर गंभीर दुखापत झाली आहे. सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्यानंतर संशयित दरोडेखोर हा पसार झाला असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. याबाबत १७ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड योगेश संजय पाटील (वय ३०) रा. निमझरी नाका यांनी फिर्याद दाखल केली आहे. १६ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ते १७ जानेवारी २०२२ रोजी संधाकाळी ७ वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक म्हणून योगेश पाटील बँक व बँकेचे एटीएम मशीनवर देखरेख करीत असतांना १७ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास तोंडाला व डोक्याला कापडी रुमाल बांधलेला अनोळखी व्यक्तीने जवळ येऊन अचानक डोळ्यात चटणी (मिरची पावडर) टाकत लोखंडी सळईने हत्याराने डोक्यावर व हातावर मारहाण केली. यावेळी सिक्युरिटी गार्ड यांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने कॉम्प्लेक्स मधील लोकांनी धाव घेतली. यावेळी दरोडेखोर संशयित घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज शहर पोलीसांनी गोळा केले असून तपास सुरू केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0