वेध भविष्यातल्या अर्थचित्राचा

16 Jan 2022 11:59:33
एका वर्षाची अखेर आणि नववर्षाचा प्रारंभ ही घटना भावनिकतेबरोबरच आर्थिक अंगानेही महत्त्वपूर्ण असते.
 
इंग्रजी कालगणनेनुसार नववर्षाचा प्रारंभ करीत असताना सुरू असणार्‍या आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीचा काळच शिल्लक असतो. म्हणूनच या काळात अर्थजगतही भविष्याचा अंदाज घेताना दिसतं. या न्यायानं सद्यस्थितीचा विचार करता काही बाबींची नोंद घेणं गरजेचं ठरतं. अलीकडे देशभरात वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रमाणात सातत्यानं घट होत असल्याचं दिसून आलं आहे. 2018 पासून ही घट नोंदविली जात असून 'बाय नाऊ पे लेटर'सारखे अधिक सुलभ पर्याय स्वीकारण्याकडे लोकांचा कल वाढत चालल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2018 मध्ये लोक सरासरी 2,80,973 रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेत होते. मात्र, मागील तीन वर्षांच्या काळात यात एक लाख रुपयांची घट झाली असून आता सरासरी 1,86,338 रुपयांचं कर्ज घेतलं जात आहे. 45 ते 58 या वयोगटातल्या लोकांमध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याचं प्रमाण बरंच घटलं असून 2018 मध्ये या वयोगटातले लोक सरासरी 3,75,662 रुपयांचं कर्ज घेत होते. 2021 मध्ये हा आकडा 1,93,240 रुपये इतका नोंदविला गेला. म्हणजे या वयोगटाचं वैयक्तिक कर्ज घेण्याचं प्रमाण 48.56 टक्क्यांनी घटलं. 25 ते 45 या वयोगटातल्या लोकांच्या वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रमाणात 30 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. आता आगामी काळात यात आणखी किती घट दिसते ते बघावं लागेल.
 

Fiscal year 
 
वैयक्तिक कर्जाची गणना असुरक्षित कर्जांमध्ये केली जाते. मागील काही वर्षांमध्ये एनपीए म्हणजे परतफेड न झालेल्या कर्जांचं प्रमाण वाढत चालल्यामुळे बँकांनी कर्जविषयक धोरणं अधिक कडक केली. याच कारणामुळे वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रमाणात घट झाल्याचं बँक अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. भारतात आता 'बाय नाऊ, पे लेटर' ही संकल्पना बाळसं धरू लागली आहे. अगदी सहज निवडता येणार्‍या या पर्यायाचा वापर वाढला आहे. बाय नाऊ, पे लेटरचा पर्याय वारंवार वापरता येतो. याच कारणामुळे वैयक्तिक कर्ज घेणार्‍यांच्या संख्येत घट होत चालल्याचं बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांचा अभ्यास करता देशाचा आर्थिक मूड बदलत असल्याची अन्य काही उदाहरणंही ठळकपणे समोर येतात. त्याचाच एक भाग म्हणजे डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांमध्ये मोठी वाढ दिसत असून येत्या काळातही वाढीचा हा रेटा अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती तसंच कोरोना काळात स्वत:च्या हक्काच्या घराची आवश्यकता लक्षात घेऊन देशभरात आर्थिक व्यवहारांमध्ये बरेच बदल पाहायला मिळाले आहेत.
 
फ्युअल कार्डस्च्या मागणीत दहा टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. देशभरात वापरल्या जाणार्‍या क्रेडिट कार्डस्मध्ये फ्युएल कार्डस्चा वाटा 13.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी विविध क्रेडिट कार्डस्मध्ये फ्युएल कार्डस्चा वाटा अवघा 4.95 टक्के होता. फ्युएल कार्डमुळे मिळणारे लाभ उठवण्यासाठी अनेक वाहनचालक अशा कार्डची निवड करीत असल्याचंही दिसून आलं आहे. आता सर्व व्यवहार खुले होत असल्यामुळे फ्युएल कार्डस्च्या मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा या क्षेत्रातले तज्ज्ञ वर्तवत आहेत. 'मनीमूड'ने केलेल्या सर्वेक्षणातून देशातल्या आर्थिक व्यवहारांचा कल लक्षात आला असून क्रेडिट कार्ड वापरणार्‍या महिलांच्या संख्येत जवळपास पाच टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. देशभरातल्या एकूण क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांमध्ये 12 टक्के महिला आहेत. 2020 मध्ये क्रेडिट कार्ड वापरणार्‍या महिलांची टक्केवारी अवघी 8.41 टक्के इतकी होती. तरुणींमध्ये क्रेडिट कार्ड वापराचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. आता 2022 मध्ये हे आकडे कुठे पोहोचतात ते बघणं रंजक ठरेल.
 
गृह कर्ज घेणार्‍यांचं प्रमाण वाढल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत गृहकर्जाचा सरासरी आकार वाढून 28.43 लाख रुपयांवर पोहोचला असून 2020 च्या चौथ्या तिमाहीत हाच आकडा 27.74 लाख रुपये इतका होता. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान गृहकर्ज घेणार्‍यांच्या संख्येत थोडी घट नोंदविण्यात आली असली, तरी तिसर्‍या तिमाहीनंतर गृहकर्जाची मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आता लोक दीड कोटी रुपयांचं भलंमोठं गृहकर्जही घेऊ लागले आहेत. क्रेडिट स्कोअर उत्तम राखण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर असून 2021 मध्ये जवळपास 72 टक्के महिलांचा क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक राहिला. दुसरीकडे, 66 टक्के पुरुषांचा क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असल्याचं आढळून आलं. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एकीकडे 40 टक्के महिलांचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा जास्त होता तर एवढा क्रेडिट स्कोअर असणार्‍या पुरुषांची संख्या 35.6 टक्के इतकी होती. बदलाचा हा प्रवाहही नोंद घेण्याजोगा आहे.
दुसरीकडे, नववर्षात क्रेडिट तसंच डेबिट कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. 2020 या वर्षात कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे डेबिट तसंच क्रेडिट कार्डांद्वारे होणार्‍या व्यवहारांमध्ये 10.8 टक्के इतकी घट नोंदविण्यात आली होती. मात्र, आता क्रेडिट तसंच डेबिट कार्डांद्वारे होणार्‍या व्यवहारांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून 2022 मध्ये डेबिट तसंच क्रेडिट कार्डद्वारे 22 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एवढंच नाही, तर 2025 पर्यंत डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणारे व्यवहार 40 लाख कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यावर लावण्यात आलेल्या शुल्कात वाढ झाली आहे. त्यामुळे रोख व्यवहारांऐवजी डेबिट तसंच क्रेडिट कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे.
 
सरलेलं वर्ष आयपीओंच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं. कोरोना महामारीच्या काळातही विविध कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 1.2 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक भांडवल उभं केलं. 2021 च्या यशानंतर 2022 मध्येही कंपन्या मोठ्या प्रमाणावर आयपीओ आणण्याची शक्यता वर्तविली जात असून याद्वारे जवळपास दीड लाख कोटी रुपये भांडवल उभं केलं जाऊ शकतं. 2022 मध्ये भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचा आयपीओ येणार असून या आयपीओकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासोबतच तांत्रिक क्षेत्रातल्या अनेक कंपन्या आयपीओद्वारे भांडवल उभं करण्याच्या तयारीत आहेत. शेअर बाजार क्षेत्रातले तज्ज्ञ संदीप भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये आयपीओच्या माध्यमातून नवे विक्रम नोंदविले जाऊ शकतात. बाजारात आयपीओ आणून कंपन्या मोठ्या प्रमाणावर भांडवल उभं करू शकतात. भांडवलाचे हे आकडे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. इतकंच नाही, तर एलआयसीचा आयपीओ फक्त भारतीयच नाही तर परदेशी गुंतवणूकदारांचंही लक्ष वेधून घेऊ शकतो.
 
आयपीओमुळे शेअर बाजारात उत्साह वाढणार असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला असला, तरी ओमिक्रॉनच्या प्रभावामुळे या उत्साहात घट होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविली जात आहे. ओमिक्रॉनच्या पृष्ठभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या काळातल्या ओमिक्रॉनच्या प्रभावाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका शेअर बाजाराला बसू शकतो, असं 'प्रभुदास लीलाधर'च्या गुंतवणूक विभागाचे प्रमुख पीयूष नागदा यांनी सांगितलं. या क्षेत्रातले आणखी एक तज्ज्ञ रिकी कृपलानीही नव्या वर्षातल्या आयपीओंच्या यशाबाबत काहीसे साशंक आहेत. अशा संमिश्र मतांच्या पृष्ठभूमीवर नववर्षात आर्थिक क्षेत्रामध्ये घडणार्‍या घटनांवर तज्ज्ञांप्रमाणेच सर्वसामान्याचंही बारीक लक्ष राहणार आहे.
 
- महेश देशपांडे
 
(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत.)
Powered By Sangraha 9.0