मोदींकडून विजेत्या पॅरालिम्पिकपटूंचा सन्मान

10 Sep 2021 19:22:50
नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी चहापानाचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पॅरालिम्पिकपटूंचा सत्कार तसेच नाश्ता-चहापानादरम्यान खेळाडूंशी संवाद साधला. अलिकडेच टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. भारतीय पॅरालिम्पिकपटूंनी 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्यपदकांसह विक‘मी 19 पदके जिंकलीत व तालिकेत 24 वे स्थान मिळविले. पॅरालिम्पिकमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
 
modi_1  H x W:  
 
टोकियोत पदक जिंकणार्‍या पॅरालिम्पिकपटूंना स्वतः फोन करून अभिनंदन करणारे व संवाद साधणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मोदींनी रौप्यपदक विजेते नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास यथिराज (बॅडमिंटन), सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर (बॅडमिंटन) व युवा खेळाडू पलक कोहली यांच्याशी संवाद साधला. पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार्‍या भारतीय बॅडमिंटनपटूंनी दोन सुवर्णांसह चार पदके मिळविली.
 
अवनी लेखरा व सिंहराज अदाना या दोघांनी प्रत्येकी दोन पदके जिंकलीत. मोदींनी त्यांच्याशीही संवाद साधला. अवनी लेखराने पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा इतिहास रचला होता. तिने कांस्यपदकही जिंकले. पोलिओ ग्रस्त 39 वर्षीय अदानाने रौप्य व कांस्यपदक पटकावले. वरिष्ठ भालाफेकपटू देवेंद्र झाझारिया व 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या मारियप्पन थंगावेलू यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. या दोघांनी टोकियोत रौप्य पदक प्राप्त केले.
Powered By Sangraha 9.0