मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. निकाल दहावी, अकरावीचे वार्षिक परीक्षेतील गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला. परिणामी यंदा बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन अशी कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन या सुविधा यंदा उपलब्ध नसतील.
विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही तक्रार असेल, तर त्याचे निवारण करण्यासाठी मंडळाने विभागीय स्तरावर हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बारावीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी यंदा श्रेणीसुधार योजनेसाठी नोंदणी केली होती, त्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. कारण श्रेणीसुधारसाठी परीक्षाच झालेली नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या एक किंवा दोन संधी उपलब्ध राहतील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबतची अन्य सांख्यिकीय माहिती हवी असल्यास www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.