तळोदा प्रतिनिधी : बोरद येथील दत्तू रोहिदास पाटील यांचे बोरद शिवारात गट क्र.२१४ मध्ये असलेल्या शेतातील पपईची ६२९ झाडे २३ ऑगस्टच्या १८.०० ते २४ च्या सकाळी ६ वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी खोडसाळपणे तोडून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान केल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यासंदर्भात माहिती मिळाल्यावरुन राजू ठाकरे (वय ३५), रा.छोटा धनपूर, ता.तळोदा, रामलाल रतनसिंग मोरे (वय ३७), रा.कळमसरा, ता.तळोदा यांना तळोदा पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा बालम वार्या वळवी, रा.छोटा धनपूर, ता.तळोदा यांच्यासोबत केला असल्याची कबुली दिली. यातील संशयित राजू ठाकरे याने यापूर्वी फिर्यादीच्या शेतातील झेंडूची फुले तोडली होती. तेव्हा शेतमालकाने त्याला मारले होते. त्यामुळे त्याने रामलाल व बालम यांच्या मदतीने पपईच्या झाडांचे नुकसान केल्याचे सांगितले. यातील दोन्ही संशयितांना अटक करण्याची कारवाई सुरु असून तिसर्या आरोपीचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा विभाग संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, सपोनि. अविनाश केदार, पोहेकॉं महेंद्र जाधव, पोना निलेश खोंडे, पोकॉं राजू जगताप, पोकॉं अजय कोळी, पोकॉं कांतीलाल वळवी यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सपोनि अविनाश केदार हे करीत आहेत.