शिंदखेडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए., एम.कॉम. व एम.एस्सी. वर्गांच्या प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू असून विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी २० ऑगस्ट २०२१ पर्यंत अंतिम मुदत घोषित केलेली आहे. ही मुदत ३० ऑगस्ट,२०२१ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्यावतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठांचे पदवीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत तसेच लगतच्या आलेल्या शासकीय सुट्यांमुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना होत असलेला उशीर, वेब साईटवरील अडचणी शिवाय विद्यापीठातील बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप अंतिम वर्षाचे गुणपत्रक मिळालेली नाहीत आदी कारणांमुळे विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करू शकलेले नाहीत. यासाठी पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत वाढविणे अत्यंत गरजेचे असून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थी हिताच्या मागणीचा विचार करून पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी मराठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.