- डॉ. नितीन विघ्ने
ती म्हणाली, मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती- विजेच्या कमतरतेपासून, झोपताना रोज-रोज चावणार्या व आमच्या कानात गुरगुरणार्या डासांपासून, पोटभर जेवण न देऊ शकणार्या जीवनापासून ते पाऊस पडल्यावर घराला पूर येताना पाहण्यापर्यंत. तिची आई मोलकरीण व तिचे वडील गाडी खेचणारे मजूर होते. घराजवळ एक हॉकी अकॅडमी होती. ती खेळ पाहण्यात तासन्तास घालवायची. तिला खेळायची तळमळ होती. गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यातून मिळेल, असे तिला वाटत होते. दिवसाला 80 रुपये कमावणार्या वडिलांना, तिला हॉकी-स्टिक खरेदी करून देणे शक्यच नव्हते. तिला आठवते रोज, सरांना मी विनंती करायची, मला शिकवा... मला शिकवा म्हणून. ते मला रोज नाकारायचे. कारण मी कुपोषित होते. पोटभर अन्न खायला मिळणेच कठीण होते; तिथे खेळायला लागणारा खुराक कुठून मिळणार? पण तरीही त्या आठ वर्षाच्या गरीब, कमजोर मुलीने हार मानली नाही. ती रोज स्वतःच स्वतःला उत्तेजन द्यायची, स्वयंप्रेरणा द्यायची उपासमारी, गरिबीमुळे सहन कराव्या लागणार्या सर्व त्रासातून मला व पूर्ण कुटुंबाला बाहेर काढायचे आहे.
एक दिवस तिला एक तुटलेली हॉकी-स्टिक सापडली आणि तिने स्वतःच सराव सुरू केला. अखेरीस, खूप पटवून दिल्यानंतर, प्रशिक्षकाने तिला प्रयत्न करू देण्याचा निर्णय घेतला. पण तरीसुद्धा हे सर्व सुरळीत चालणे सोपे नव्हते. ती मुलगी असल्यामुळे आधी तिला हाफपॅन्ट घालून खेळायची घरून मनाई होती, पण नंतर तिने परवानगी मिळविली. अकादमीमध्ये सर्व मुलांनी दररोज 500 मिली दूध आणणे अपेक्षित होते. माझे कुटुंब फक्त 200 मिली किमतीचे दूध घेऊ शकत होते; कोणालाही न सांगता, मी दूध पाण्यात मिसळून प्यायची. कारण मला खेळायचे होते. शिवाय, प्रत्येकाने सकाळी लवकर प्रशिक्षण सुरू करणे अपेक्षित होते. घरी घड्याळ नसल्यामुळे तिची आई बिचारी उठून तिला उठवण्याची योग्य वेळ झाली का, हे पाहण्यासाठी आकाशाकडे पाहत जागत बसायची. अडचणीतून का होईना, तिच्या स्वयंप्रेरणा देणार्या तिच्या विशेष चिकाटीमुळे तिचा प्रवास सुरू राहिला. हळूहळू ती छान खेळू लागली. तिच्या प्रशिक्षक सरांनीही मग तिला मदतीचा हात दिला. त्यांनी तिला हॉकीकिट आणि शूज खरेदी करून दिले. तिची खेळण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहून त्यांनी तिला स्वतःच्या कुटुंबात जागा दिली आणि या प्रकारे तिच्या आहाराच्या गरजा पूर्ण केल्या. ती सराव करण्याचा एकही दिवस चुकू देत नव्हती. तिच्या आयुष्यातील पहिली कमाई 5000 रुपये तिने वडिलांच्या हातात ठेवली. एक स्पर्धा जिंकल्या बद्दल तिला मिळालेले ते बक्षीस होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. कारण त्यांच्या संपूर्ण जीवनात एवढे पैसे एकाच वेळी त्यांच्या हातात कधीच आले नव्हते. तिने तेव्हा तिच्या कुटुंबाला एक वचन दिले, ‘एक दिवस, आमचे स्वतःचे घर असणार आहे.’
त्या दिशेने काम करण्यासाठी तिने तिचे पूर्ण सामर्थ्य पणाला लावले आणि मग तिच्या कठोर तपश्चर्येची फळे मिळू लागली. आधी शालेय स्तरावर, मग राज्य स्तरावर आणि फक्त वयाच्या 15 व्या वर्षी ती भारताच्या 2010 च्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय महिला हॉकी संघातील सर्वात तरुण खेळाडू होती. तिने आजपर्यंत 212 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 134 गोल्स केले आहेत. चार वर्षांपूर्वी तिने तिच्या कुटुंबाला दिलेले वचन पूर्ण केले- तिने त्यांच्यासाठी एक घर खरेदी केले! ती आता सांगते- त्या दिवशी आम्ही एकत्र रडलो आणि एकमेकांना घट्ट पकडले! 2020 साली भारत सरकारने आता 26 वर्षे वय असणार्या राणी रामपाल या राष्ट्रीय महिला हॉकी संघाची कप्तान असणार्या वाघिणीचा राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्री हे दोन मोठे पुरस्कार देऊन सन्मान केला. तिचीच ही संघर्ष गाथा! तुटलेल्या हॉकी-स्टिक्सपासून सध्या चालू असणार्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत राणी रामपालच्या प्रेरणादायी प्रवासामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या पोस्टने हजारो ‘लाईक्स’ मिळविले आहेत, तर कमेंट्स विभागात लोकांनी तिचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू आणले. मादागास्करची ही महिला भारताच्या हॉकी संघासाठी मूळ धरेल व सुवर्ण काळ आणेल! हे तिच्या एका फेसबुक चाहत्याने लिहिले आहे.
राणी रामपाल म्हणते- यावर्षी, मी पालकांच्या कष्टाची आणि माझ्या प्रशिक्षक सरांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच त्यांचे स्वप्न आहे, हे मला माहिती आहे. तिने पाहिलेलं हे एक अत्यंत कठीण स्वप्नं पूर्ण होतं की नाही, ते आपल्याला कदाचित हा लेख वाचाल तोपर्यंत कळलेले असेल!
फिजिक्सच्या एका प्रयोगात, सारख्याच लांबीच्या मार्गावर, काचेचे सारख्या आकारांचे कंचे, सारख्याच उंचीवरून दोन मार्गावर सोडले. एक मार्ग सरळ रेषेत खाली येणारा तर दुसरा मार्ग उंच-सखल मार्गावरून खाली येणारा होता. पण आश्चर्यकारकरीत्या उंच-सखल मार्गावरील कंचा सरळ मार्गापेक्षा लवकर आपल्या ध्येयाजवळ पोचला. मानवी जीवनालासुद्धा हाच नियम लागू आहे. नऊ ते पाच साचेबद्ध जीवन जगणार्या लोकांपेक्षा संघर्ष करून ध्येयाचा पाठलाग करणारेच जास्त यशस्वी, समाधानी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात, असे जागतिक संशोधन सांगते. तसेच जगातील अतिश्रीमंत लोकांची आणि अतियशस्वी लोकांची यादी तपासून पहिली असतासुद्धा हीच गोष्ट, एक नव्हे, अनेक नव्हे तर प्रत्येक वेळा सिद्ध झाली आहे की, जी मंडळी जीवनात कठीण प्रसंगी असो की काहीच आशा नसतानाच्या प्रसंगी स्वतःच स्वतःला उत्तेजन देत राहिलीत, तीच मंडळी आयुष्यात काहीतरी चांगले ध्येयं प्राप्त करतात. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला आई-वडील, गुरु किंवा मित्र मदतीला येतील, असे शक्यच नाही आणि तशी अपेक्षाही नसावी. स्वतः मेहनत न घेता दुसर्यांकडून अपेक्षा ठेवणारे जीवनात यशस्वी होत नाहीतच; मात्र इतरांना त्रास देण्याचे कारण बनतात.
स्वयंप्रेरणेने यशप्राप्तीसाठी नेमके काय करावे?
स्वतःला सतत आशादायी अवस्थेत ठेवणे आणि चांगले काम करीत राहण्याची स्फूर्ती कायम ठेवणे, हे एक सॉफ्ट-स्किल किंवा बुद्धी-भावना-व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. याचा अर्थ हाच की, ज्याला उत्साह वाटत नसेल त्याला वैज्ञानिक पद्धतीने उत्साही करता येऊ शकतं आणि ते कार्य करणे हेच एक कौशल्य आहे. जसे पोहण्याचे, खेळण्याचे, गाण्याचे कौशल्य शिकविता येतं तसेच स्वतःला आनंदी ठेवणे, उत्साही ठेवणे, स्वतःला व इतरांना उत्तेजन देणे, आत्मविश्वास वाढवणे, धैर्य वाढवणे, भीती कमी करणे ही सॉफ्ट-स्किल्ससुद्धा शिकविता आणि शिकता येतात. 4 एप्रिलपासून सुरू केलेली ‘कशासाठी? यशासाठी!’ ही संपूर्ण लेखमाला सॉफ्ट-स्किल्सच्या 114 विषयांवरच आधारित आहे. आता स्वतःला प्रेरणा देण्यासाठी काय काय करायचे ते पाहू.
1. आधी स्वतःचे परीक्षण करा. आपल्याला जाणवणार्या त्रासांची, संकटांची, धोक्यांची तसेच त्यावर सुचणार्या चांगल्या उपायांची यादी करा. यासाठी खरोखरच कागद-पेन घेऊन बसा आणि कागदावर नीट परिस्थिती मांडा. फक्त मनातल्या मनात विचार करीत बसू नका. या कामासाठी इतरांची मदत व माहिती घेऊ शकता. कधी करिअर कौन्सेलिंगच्या तर कधी मानसोपचार माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत मी मदत करीत आलो आहे.
2. कठीण किंवा अशक्य वाटणार्या आपल्या ध्येयाचे, शक्य होऊ शकतील असे भाग पाडा. सगळे एकदमच करण्याची घाई करू नका. ध्येयपूर्तीसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये वाढवा आणि दृष्टिकोन सुधारित करा. आपल्या कामाची कौशल्ये आपले सर्वोत्तम मित्र बनवा. निरोगी सवयी, प्रतिभा जागती ठेवा, आध्यात्मिक उन्नती करा योगा करा, व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या फिट व्हा. भरपूर विश्रांती आणि संतुलित आहार मिळवा. नवीन गोष्टी शिका आणि चांगले मित्र मिळवा. आपले वैयक्तिक संबंध सुधारित करा. चांगले कपडे घाला! इतरांचे मनापासून कौतुक करा.
3. यशस्वी लोकांच्या उदाहरणाचे अनुसरण करा. तुमच्या सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करा तसेच सकारात्मक विचार असणार्या व ऊर्जापूर्ण व्यक्तींच्याच संगतीत राहा. ‘तू हे करू शकत नाही’ असे म्हणणार्या व्यक्तींच्या सोबत राहू नका. मात्र, यांना मी एक दिवस यशस्वी होऊनच दाखवीन, असा विचार सतत करत राहा आणि त्याला योग्य कृतीची जोड द्या. मागील चुकांबद्दल स्वत:ला माफ करा. संकट आले, अपयश आले तर सगळे संपले. आता काहीच शक्य नाही अशा प्रकारचे विचार ऐकू पण नका आणि तसे विचार स्वतःही करू नका. कारण मार्ग निश्चितच असतो. फक्त आपण एकाच चौकटीत विचार करीत राहिल्यामुळे चौकटीबाहेरचा मार्ग आहे, हे शोधतच नाही. खालील उदाहरण या बाबतीत खूपच परिणामकारक आहे. खरंच कागद-पेन घेऊन करून पहा. खालील आकृतीत दाखवलेले नऊ थेंब किंवा ठिपके पेन न उचलता, कागद फोल्ड न करता, रेषे वर रेष ओव्हरलॅप न करता आणि फक्त चार सरळच रेषा वापरून जोडता येतील का? प्रयत्न करून पहा.
तुमचे उत्तर माझ्या वर दिलेल्या व्हॉट्स अॅप नंबरवर पाठवा आणि नंतर चारच्या ऐवजी तीनच सरळच रेषा वापरून तेच 9 थेंब जोडून दाखवा म्हटले तर बघा, शक्य आहे का?
4. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्मनाला आज्ञा द्या की मला नवीन उपाय किंवा मार्ग दाखव आणि तो मार्ग मिळतोच, असा जगाचा अनुभव आहे. अनेकदा रात्री स्वप्नात किंवा सकाळी उठल्यावर आपल्याला तो नवीन उपाय किंवा मार्ग सापडलेला असतो. उदा. बेन्झीन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाला बेन्झीन-रिंगची रचना अशीच सुचली. विषय मोठा आहे. तेव्हा वाचकांच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
(लेखक सायकॉलॉजिस्ट, करीअर कौन्सेलर व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहेत)
-9822462968