सध्या थंडीने जोर पकडला आहे आणि या वातावरणात चहा हवाहवासा वाटतो. पण, जास्त साखर पोटात जाणे हितावह नसल्यामुळे चहा नको! असं म्हटल्या जातं. साखरेऐवजी गुळाचा चहा चविष्ट तर असतोच शिवाय पौष्टीकही असल्याने फायदेशीर ठरतो. पण, बरेचदा गुळाचा चहा नासतो, असा अनुभव येतो. आज आपण दूध न फाटता छान, चविष्ट आणि हिवाळ्यात आरोग्याला हितकारक असा गुळाचा चहा कसा बनवायचा हे बघूया !
एका पातेल्यात चहाचे आधण ठेवावे. साधारण एक कप पाण्यासाठी त्यात एक चमचा चहापत्ती टाकावी. याला छान उकळी आली की, त्यात थोडी विलायची पूड आणि किंचित जायफळ पूड घालावी. आता या चहात दूध घालून उकळून घ्या. आता पातेल्याखालचा गॅस बंद करून, चहा निवला की त्यात गूळ चुरून घालावा. शक्यतो रसायनविरहीत गूळ वापरावा. आता हा गूळ घातलेला चहा अजिबात न ढवळता, गॅस लावून उकळून घ्या. नेहमीप्रमाणे कपमध्ये गाळून घ्या ! दूध अजिबात फाटणार नाही आणि थंडीच्या दिवसात मस्तपैकी गुळाच्या चहाचा आनंद घ्या !