नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाला पाच लाखांची ग्रंथसंपदा भेट
05 Dec 2021 18:32:17
नवापूर : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या श्रीमती धीमीबाई सुरूपसिंग नाईक ज्ञान स्रोत केंद्राला (ग्रंथालयाला) गुजरात राज्यातील एका सेवाभावी संस्थेने रुपये पाच लाखांचे एक हजार ९५० ग्रंथ भेट स्वरूपात दिले. यात गुजराती भाषेतील १६५० ग्रंथ, इंग्रजी भाषेतील ३० ग्रंथ, हिंदी भाषेतील १०० ग्रंथ, १५० दुर्मिळ ग्रंथ व २० अति दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. या सर्व ग्रंथसंपदेमुळे ग्रंथालयाच्या ग्रंथवैभवात निश्चितच भर पडली असून विविध क्षेत्रातील वाचक, विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांसाठी बौद्धिक मेजवानीच ठरणार आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात श्रीमती धीमिबाई सुरूपसिंग नाईक ज्ञान सोत्र केंद्राची सुसज्य तीन मजली इमारत असून यात एकूण तीस हजार एकशे वीस ग्रंथ आहेत. ग्रंथालय संपूर्ण संगणकीकृत असून त्यात ग्रंथ देवघेव विभाग, विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त वाचन कक्ष, ज्येष्ठ नागरिकांसाठी व अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र वाचन कक्ष, ई-ग्रंथालय, स्वतंत्र संशोधन कक्ष, दुर्मिळ व अतिदुर्मिळ ग्रंथ संग्रह, हस्तलिखित संग्रहालय, डिजिटल कक्ष, ई-पुस्तके, ई- मासिके, विशेष अहवाल, भेट ग्रंथसंग्रह, संशोधन प्रबंध, रीप्रोग्राफी अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ग्रंथालयातील हस्तलिखिते व अति दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन झालेले असून वाचकांना त्यांची ई-प्रत दिली जाते. ग्रंथालयाचे स्वतंत्र संकेत स्थळ असून त्यावर विद्यार्थांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विविध लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
ग्रंथालयाला मिळालेल्या रुपये पाच लाखांच्या ग्रंथसंपदेबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरुपसिंग नाईक, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक, उपाध्यक्ष हरिषकुमार अग्रवाल, सचिव अजित नाईक, तानाजीराव वळवी, खजिनदार आरीफभाई पालावाला, सहसचिव मधुकर नाईक, सहसचिव अजय पाटील व इतर सर्व सन्माननीय संचालक मंडळाने ग्रंथपाल प्रा.आर.के.तुपे, प्राचार्य डॉ.ए.जी.जयास्वल व ग्रंथालय समितीचे अभिनंदन केले व ग्रंथसंपदा भेट देणार्या आजी, माजी विद्यार्थी व वाचक तसेच सेवाभावी संस्थेचे आभार व्यक्त केले.
अश्याच पद्धतीने ग्रंथ दात्यांनी पुढे येऊन ग्रंथालयाला ग्रंथसंपदा, दुर्मिळ, अतिदुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते, ई-पुस्तके, संशोधन प्रबंध, अहवाल, विशेष अहवाल आदी भेट स्वरूपात द्यावी व ग्रंथालय अधिक समृध्द करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ग्रंथपाल प्रा.आर.के.तुपे यांनी केले.