रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन मॉडेल हॉस्पिटल बनविणार - भूपेशभाई पटेल

31 Dec 2021 20:14:10
शिरपूर : स्व. हेमंतबेन (मम्मीजी) पटेल मेमोरियल आय हॉस्पिटलचे भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने झाले असून १०० बेडचे हे प्रस्तावित हॉस्पिटल लवकरच २०० बेडचे करण्यात येईल. नेहमी मी पडद्यामागून काम करतो. मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आहोत. मोतीबिंदू शिबीर घेऊन आतापर्यंत आपण हजारो रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना लाभ मिळवून दिला आहे. एस. व्ही. के. एम. फाउंडेशन मार्फत मेहा दीदी व द्वेता दीदी यांनी देखील आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.
 
shirapur 
 
आनंद गुजरात येथील शंकरा आय हॉस्पिटलने देखील चांगली सेवा दिली आहे. मम्मीजी, पप्पाजी व आपल्या परिवाराला आमोदे गावाने खूप सन्मान दिला, त्या सन्मानाची परतफेड आज आम्ही हॉस्पिटलच्या उभारणीच्या निमित्ताने करत आहोत. आमोदे गावाची ऋण परतफेड करायची आहे. नवीन हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांना आम्ही मम्मीजी यांच्या दृष्टीने पाहणार, मम्मीजींची इच्छा पूर्ण होणार. मम्मीजी आय हॉस्पिटल यशस्वी करायचे आहे, रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन आ. अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल हॉस्पिटल बनविणार. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच क्रिटिकल शस्रक्रिया कमीत कमी खर्चात करणार. या हॉस्पिटलमुळे खानदेशच्या रुग्णांना लाभ मिळून आरोग्य सेवेत भर पडणार आहे. हे हॉस्पिटल घराचे वातावरण रुग्णांना देणार असे मनोगत रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशनचे उपाध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी व्यक्त केले.
 
रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशन शिरपूर संचलित स्व. हेमंतबेन (मम्मीजी) रसिकलाल पटेल मेमोरियल आय हॉस्पिटलचा ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा. भूमिपूजन कार्यक्रम झाला. सुरुवातीला मम्मीजी यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. काशिराम पावरा म्हणाले, आपण सर्व जण खूप नशीबवान आहोत, आपल्याला भाईंसारखे नेते लाभले. भाईंचे काटेकोर नियोजन असते. भाईंनी शैक्षणिक, आरोग्य, पाणी, धार्मिक क्षेत्रात देखील मोठे कार्य केले असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन सर्वांनी मनापासून काम करु या. माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर शहर व तालुक्यात रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशन मार्फत अनेक वर्षांपासून आनंद (गुजरात) येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये आतापर्यंत २८ हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांची तपासणी झाली आहे. १८ हजार पेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून भाईंकडून २२ हजार पेक्षा जास्त रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत.
 
धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे म्हणाले, आईचे प्रेम, आशीर्वाद आपल्याला नेहमीच चांगला मार्ग दाखवितो. मम्मीजी यांच्या नावाने आय हॉस्पिटल सुरु होतेय ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.व्यासपीठावर आ.काशिराम पावरा, रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशनचे उपाध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, डॉ. किशोर इसई (शंकरा आय हॉस्पिटल, आनंद गुजरात), डॉ.सत्यानंद (आनंद गुजरात), माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, बबनलाल अग्रवाल, जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य यतिष सोनवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, आमोदे येथील सरपंच हर्षालीदेवी देशमुख, उपसरपंच लतादेवी राजपूत, सुभाष कुलकर्णी, भटू माळी, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, संचालक नवनीत राखेचा, जगदिश देशमुख अनिल भामरे, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, गोपाल भंडारी, राहुल दंदे, चंद्रकांत पाटील, विजय अग्रवाल, भालेराव माळी, संजय चौधरी, प्रकाश गुरव, कल्पनाताई राजपूत, रत्नदिप सिसोदिया, दादू देशमुख, सोनू राजपूत, कल्याणसिंग राजपूत, प्रवीण देशमुख, भुरा राजपूत, राजेंद्र देवरे, ईश्वर पाटील, सुनिल जैन, योगेश्वर माळी, शिरपूर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी, नागरिक, भूपेशभाई फ्रेंड सर्कल, विकास योजना आपल्या दारी अभियानचे स्वयंसेवक उपस्थित होते.
 
यावेळी रत्नदिप सिसोदिया म्हणाले, आमोदे गावाच्या वतीने भाईंचे आभार मानतो. शिरपूर परिसरात शैक्षणिक हब, पाण्याचे काम, आरोग्य क्षेत्रात आता आमोदे गावाचा विकास होतोय. पटेल परिवार सर्वांसाठी देवदूत आहेत, त्यांच्यामुळे अनेकांचा पुनर्जन्म झाला आहे. त्यांची सहकार्याची भूमिका व विकासाची दृष्टी सर्वांसाठी आहे. महादेवाच्या आशीर्वादाने व भाईंच्या योगदानातून आमोदे गावाला मम्मीजी यांच्या हॉस्पिटलच्या रुपात मोठी भेट मिळाली आहे. आनंद गुजरात येथील शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. किशोर इसई म्हणाले, मी गेल्या काही वर्षांपासून पटेल परिवाराचे उत्तम आरोग्याचे काम पाहिले आहे. त्यांनी मनापासून आरोग्य सेवा बजावली आहे. शिरपूरचे रुग्ण यांच्या साठी आनंद गुजरातला ने आण व इतर सेवेसाठी भाईंनी भरपूर आर्थिक सहकार्य केले. रुग्णांना मनापासून भाई सेवा देतात, येथील नवीन हॉस्पिटल मार्फत ते चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करतीलच.
 
प्रास्ताविकात सुभाष कुलकर्णी यांनी स्वर्गीय मम्मी जी आय हॉस्पिटल बद्दल माहिती देऊन भाईंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सेवेबद्दल माहिती दिली. भाई म्हणजे विश्वास, भरोसा असल्याचे सांगितले. आभार सुभाष कुलकर्णी यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0