नूतन वर्षात २४ पैकी ६ सुट्ट्या रविवारी!

27 Dec 2021 13:12:11
ठाणे : सरत्या वर्षी शुक्रवार, दि. ३१ डिसेंबर रोजी 'लीप सेकंद' धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन २०२२ चा प्रारंभ ठीक १२ वाजता होणार आहे. सन २०२२ मध्ये एकूण २४ सुट्ट्यांपैकी श्रीरामनवमी १० एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बकरी ईद १० जुलै, गांधी जयंती २ ऑक्टोबर, ईद ९ ऑक्टोबर आणि नाताळ २५ डिसेंबर अशा एकूण सहा सुट्ट्या रविवारी येत आहेत. २०२२ हे वर्ष लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Holiday_1 
 
२०२२ मधील इतर घटनांची माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की, “२०२२ मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी मंगळवार, दि. २५ ऑक्टोबरचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि मंगळवार, दि. ८ नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मात्र, शनिवार, दि. ३० एप्रिलचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि सोमवार, दि. १६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.
 
खगोलप्रेमींसाठी नूतन वर्षी दि. ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ऑगस्ट, २२ ऑक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबरच्या रात्री आकाशात उल्कावर्षाव पहाण्याची संधी आहे. मंगळवार, दि. १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या आणि बुधवार, दि. १३ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येणार असल्याने आपणास दोन वेळा 'सुपरमून'देखील पाहायला मिळणार आहे. मात्र, इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येत नसल्याने 'ब्ल्यू मून' योग मात्र यावर्षी येणार नाही. गणेशभक्तांसाठी दि. १९ एप्रिल आणि दि. १३ सप्टेंबर अशा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थी आहेत.
 
सुवर्ण खरेदी व विवाहेच्छुकांचे वर्ष
 
“२०२२ या नूतन वर्षात सुवर्ण खरेदी करणाऱ्यां साठी दि. ३० जून, २८ जुलै आणि २५ ऑगस्ट असे तीन गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. नूतन वर्षात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने वगळता इतर नऊ महिन्यांत बक्कळ विवाह मुहूर्त असल्याने विवाहेच्छुक खूश होणार आहेत,” असेही सोमण यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0