नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी अजिंठालेणी हाऊसफुल्ल

26 Dec 2021 17:22:11
सोयगाव : नववर्षाची चाहूल, नाताळाच्या सुट्या व त्यास लागून आलेल्या शनिवार व रविवारमुळे अजिंठालेणी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांचे मोठ्या संख्येने आगमन झाल्याने पर्यटन विकास महामंडळाचे फर्दापूर-अजिंठालेणी टी पॉइंट येथील वाहनतळ दुपारीपर्यंतच हाऊसफुल्ल झाल्याचे पहायला मिळालेे.
  
soyagaon_1
 
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून अजिंठालेणीतील पर्यटन व्यवसाय डबघाईस आल्याचे दिसून येत होते. कोरोनाकाळापासून येथील पर्यटन व्यवसायावर घोघावणारे मंदीचे सावट पूर्णपणे दूर होऊन शनिवार, रविवारी रोजी अजिंठालेणी व्यापार संकूलन व लेणी परिसरातील हॉटेल्स व लॉजिंग्स गर्दीने फुलून गेले होते.मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या सावटामुळे अजिंठालेणीतील पर्यटन व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर अजिंठालेणी पर्यटकांसाठी नियमित खुली करण्यात आल्या. मात्र पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट कायम होते. शनिवारी अजिंठालेणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. रविवारी ही अजिंठालेणीत पर्यटकांची मांदियाळी होती. नाताळाच्या सुट्ट्यांमुळे या आठवड्यात अजिंठालेणी भेटीवर येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.पर्यटन व्यवसायाला नाताळ व नववर्षाच्या आगमनाने सुगीचे दिवस आले आहेत. मात्र राज्यात सध्या ओमीक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने पर्यटनस्थळ किती दिवस खुले राहिल याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
 
संपातही एसटीची सेवा सुरळीत
अजिंठालेणी येथे शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटकांच्या सुविधेसाठी एसटीच्या सोयगाव आगाराने शनिवारी अजिंठालेणीत १३ बसेस तैनात केल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी असूनही शनिवारी, रविवारी अजिंठालेणीत वाहतूक सेवा अत्यंत सुरळीत पार पडली. विशेष म्हणजे राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा परिणाम येथील एसटीच्या वाहतूक सेवेवर झाला नाही. सोयगाव बस आगारात शनिवार रोजी एसटी बसचे उत्पन्न एकूण एक लाख ७२ हजार ९९५ रुपये इतके उत्पन्न आले असल्याचे सोयगाव बस आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
 
 
गर्दी वाढल्याने तिकिट खिडकींवर रांगा
नाताळाच्या सुटीमुळे शनिवारी सकाळी ९ वाजेपासूनच पर्यटक मोठ्या संख्येने अजिंठालेणीत दाखल होण्यास सुरुवात झाली.त्यामुळे पर्यटन महामंडळाच्या तिकीट खिडकींवर प्रवेशासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत पर्यटन महामंडळाचे फर्दापूर-अजिंठालेणी टी पॉइंट येथील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने व्यवस्थापक रामदास क्षीरसागर यांनी पर्यटन महामंडळाच्या अजिंठालेणी व्हिजीटर सेंटरमधील वाहनतळ पर्यटकांसाठी खुले करुन पर्यटकांना तातडीने वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन दिली.
 
Powered By Sangraha 9.0