शिंदखेडा : येथील नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ चा प्रश्न लवकरच कायमचा सुटण्याचा मार्गावर असून याबाबत उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ बाबत एक नवीन समिती नेमण्याची व शिष्ट मंडळाची भेट घेवून चर्चा करण्याचा तसेच पिकाखालील जमिनी वगळण्याचा सूचना संबंधित औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्याकडे २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा चालु ठेवला होता. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.
शिंदखेडा येथील नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ च्या प्रश्नाबाबत बुधवार १५ रोजी मुंबई येथे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके उपस्थित होते. यावेळी बोलतांना साळुंके म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा ग्रोथ सेंटर या नावाने औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. त्यापैकी टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ अंतर्गत जमिनीचे वाटप झालेले असून तुरळक प्रमाणात उद्योग देखील सुरु आहेत. टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ मध्ये ३५५ हेक्टर जमिन संपादित झाली असून त्यापैकी ३५ टक्के जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरु आहेत. ६० टक्के भुखंड अजुनही बखळ आहेत. असे असतांना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने टप्पा-३ मध्ये नरडाणा औद्योगिक क्षेत्राला लागून नरडाणा, माळीच, गोराणे व वाघोदे परिसरातील काळी, कसदार, सुपिक व बागायती ६५३ हेक्टर जमीन संपादित करण्याबाबत सन २०१०-११ मध्ये अधिसूचना काढली. शेतकर्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शिक्के मारण्यात आले व ते आजपर्यंत कायम आहेत. गेल्या दहा वर्षापासून शेतकर्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनीचा मोबदलाही मिळत नाही व सातबार्यावरील शिक्केही काढले जात नाहीत. परिणामी शेतकर्यांना जमिनी विकता ही येत नाही व बँका कर्ज ही देत नाही. त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकर्यांसोबत बैठक झाली. परंतु शेतकर्यांसोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्या.
याबाबत उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ बाबत अधिकार्यांनी एक नवीन समिती नेमावी. त्या समितीने नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. तसेच या संदर्भात तेथील शेतकर्यांशी चर्चा करावी. चर्चेअंती शेतकर्यांना एकतर जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अथवा शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावरील महामंडळाचे शिक्के काढून टाकण्याचा सूचना उद्योगमंत्री ना.देसाई यांनी बैठकीमध्ये अधिकार्यांना दिल्या. त्यानुसार लवकरच औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांची एक समिती नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ येथे प्रत्यक्ष भेट देणार असून शेतकर्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.