श्रीजेशची जागा भरून काढणे अवघड : सूरज करकेरा

13 Dec 2021 14:31:41
नवी दिल्ली : अनुभवी गोलरक्षक पी.आर. श्रीजेशची जागा भरून काढणे अवघड राहील, असे युवा भारतीय गोलरक्षक सूरज करकेरा म्हणाला. ढाका येते होणार्‍या आगामी आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेसाठी विश्रांती घेत असलेल्या पीआर श्रीजेशच्या जागी सूरज करकेराची निवड करण्यात आली आहे. 26 वर्षीय करकेरा 2019 मध्ये टोकियो ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत भारताकडून शेवटचा खेळला होता.
 
Sreejesh_1  H x
 
 
बर्‍याच काळानंतर भारताकडून खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. भारतीय जर्सी परिधान करण्याची संधी मिळते, याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेसाठी आम्ही चांगला सराव केला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असे तो म्हणाला. अनुभवी गोलरक्षक श्रीजेशला स्पर्धेतून विश्रांती दिल्याने गोलरक्षणाची जबाबदारी सूरज कारकेराकडे असणार आहे. पीआर श्रीजेशने इतकी वर्षे भारतासाठी खूप काही केले आहे. त्याची जागा भरणे नेहमीच कठीण असते, मात्र जेव्हाही मला संधी मिळेल तेव्हा मी माझे 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन, असे तो म्हणाला.
 
आम्ही पीआर श्रीजेशकडून इतके दिवस शिकत आलो. गोलरक्षण प्रशिक्षणादरम्यान तो आपले ज्ञान सर्वांसोबत सामायिक करतो आणि आम्हाला अनेक टिप्स देतो. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, असे तो पुढे म्हणाला. उपकर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अनुभवी खेळाडू वरुण कुमार यांच्याशिवाय भारताने जर्मनप्रीत सिंग, दीपसन टिर्की, निलम संजीप झेस आणि मनदीप मोर या युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर भारताची ही पहिलीच स्पर्धा असेल. तीन वेळच्या विजेत्या भारताचा सलामीचा सामना 14 डिसेंबर रोजी कोरियाविरुद्ध होणार आहे.
Powered By Sangraha 9.0