नव्या कोरोनामुळे रद्द होणार नाही टीम इंडियाचा दौरा

27 Nov 2021 15:00:27
मुंबई : टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन मॅचची टेस्ट, वन-डे आणि टी20 सीरिज होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हायरस आढळल्यानं हा दौरा धोक्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे. भारत सरकारनं ही या देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटोकोर तपासणी करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यामुळे टीम इंडियीाच्या आगामी दौऱ्याबाबत बीसीसीआयनं अपडेट दिले आहे.
 

cricket_1  H x
 
 
एका वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका सरकारनं देशात हाय अलर्ट जारी केला आहे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये हा व्हायरस झपाट्यानं पसरतोय. याच भागातील जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया या शहरांमध्ये टीम इंडियाचे सामने होणार असल्यानं बीसीसीआयची काळजी आणखी वाढली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार सध्या या दौऱ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून क्रिकेट साऊथ आफ्रिकेशी संपर्कात आहोत. या कठिण परिस्थितीमध्ये सर्व गोष्टी लवकरच नियंत्रणात येतील अशी आपण फक्त आशा करू शकतो.
 
टीम इंडियाची या दौऱ्यातील पहिली टेस्ट 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. नेदरलँडची क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी ही टीम आफ्रिकेत आली आहे. त्यामधील पहिला सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द करावा लागला. आता उर्वरित सामने खेळायचे की नाही, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये होणार आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेचा समावेश हा रेड लिस्टमध्ये केला आहे. आगामी काळात या देशात प्रवासाचे निर्बंध आणखी कडक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाचा नियोजित दक्षिण आफ्रिका दौरा देखील संकटात आला आहे.
Powered By Sangraha 9.0