नंदुरबार घरफोडीतील २ अट्टल गुन्हेगारांना पुणे येथून अटक

24 Nov 2021 20:27:38
नंदुरबार : मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे पोलीसांसमोर आवाहन बनले होते. यावरुन पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत चर्चा करुन दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालुन आरोपींना अटक करुन त्यांचेवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत सक्त निर्देश दिले.
nd_1  H x W: 0
 
१० नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा १० ते १३.३० वा. दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलुप तोडुन १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथील घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचे देखील घराचे कुलुप तोडुन २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमंतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाची एम.एच.१८ पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी भरधाव वेगाने आपले वाहन धुळे रोडकडे वळविले. चारचाकी वाहनाचा पाठलाग करीत असतांना संशयीत आरोपींनी दोंडाईचा येथून वाहन सारंगखेडा गावाकडे वळविले व तेथे एका शेतातील झाडाला ठोकले गेल्यामुळे संशयीत आरोपी चारचाकी वाहन सोडुन पळुन गेले. पळुन गेलेल्या दोन्ही संशयीतांचा आजु-बाजुच्या परिसरात रात्रभर शोध घेवुन ते मिळुन आले नाही.
 
सदर चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र, कपड्यांची बॅग, दवाखान्याचे कागदपत्र व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे टॅमी हत्यार व इतर साहित्य मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सदरची घटना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळविली. वरिष्ठांच्या वरील सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळे पथक तयार करुन ११ नोव्हेंबर रोजी एक पथक मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ, इंदौर, सिहोर जिल्ह्यात तर एक पथक पुणे येथे संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना केले. तसेच नंदुरबार जिल्ह्याला लागुन असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडीचे दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले.
 
पुणे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयिताची पत्नी व तिचा एक मित्र अशांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीसी खाक्या दाखवून त्यांना बोलते केले. तरी देखील त्यांनी काही एक उपयुक्त माहिती दिली नाही.
 
२२ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी गोपाळपट्टी, मांजरी याठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. मुख्य संशयीत आरोपी त्याठिकाणी सायंकाळी आला, त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालाक असा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्षात येताच त्याने त्याठिकाणाहुन पळ काढला. सापळा लावून बसलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे १ किलो मिटर पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेवून त्यांचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा (वय-४०) रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश असे सांगितले. त्यास नंदुरबार येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले. त्याच्या दुसर्‍या साथीदाराबाबत विचारपूस केली असता सध्या तो शिक्रापूर जि. पुणे येथे भाडे तत्वावर घर घेवून राहत असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी शैलेंद्र विश्वकर्मा यास सोबत घेवून शिक्रापूर येथे जावून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता एका छोट्याश्या घरामधून दुसर्‍या संशयीतास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी) (वय-४०) रा. राजीव गांधीनगर, अयोध्या रोड, पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0