वैंदाणे येथील खुनप्रकरणी तीन संशयितांना अटक

20 Nov 2021 20:40:38
नंदुरबार : तालुक्यातील वैंदाणे ते खोक्रोळे रस्त्यादरम्यान मोयाणे गावाच्या शेत शिवारात १४ नोव्हेंबर रोजी एका विहीरीत एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्यांची ओळख पटविली होती. नंदुरबार तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेला या खुनाच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
khun_1  H x W:
 
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन विहीरीतून बाहेर काढलेल्या मृतदेहाची पाहणी केली. मयत इसमाच्या उजव्या हातावर संजय राजेंद्र मोरे असे त्रिशुलमध्ये गोंधलेले असल्याने त्याची ओळख पटवून सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सदा सामुद्रे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् खुनाचा व पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
 
या घटनेच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदारांचे मिळून वेगवेगळे ८ पथके तयार करुन पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.गुन्हा घडून काही दिवस झाले होते तरी पोलीस पथकांना आरोपी पकडण्यात यश येत नव्हते. १९ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, मयताचे शनिमांडळ गावातील काही इसमांशी भांडण झाले होते व त्या वादातूनच त्याचा खुन झाला असावा अशी त्रोटक माहिती मिळाल्याने शनिमांडळ गावातील काही संशयीत इसमांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले, त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ६ नोव्हेंबर रोजी मयत संजय राजेंद्र मोरे हा त्यांच्या घरी वाईट उद्देश्याने आल्याने त्याचा त्यांना राग आला. त्यामुळे त्यांनी त्याचा शनिमांडळ व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्याच दरम्यान तिन्ही संशयीत आरोपीतांना मयत संजय मोरे हा रनाळा ते घोटाणे दरम्यान असलेल्या कार्ली फाटा येथील हॉटेल कर्मभुमी येथुन जेवण करुन बाहेर निघतांना दिसला. त्याचा तिन्ही संशयित आरोपीतांना पाठलाग करुन त्यास हॉटेल कर्मभुमीच्या पुढे सुमारे २०० मिटर अंतरावर अडवून त्यास त्यांच्याकडे असलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण करुन बेशुध्द केले. त्यानंतर त्यास शनिमांडळ शिवारात इंद्रीहट्टी रस्त्याला असलेल्या तलावाजवळ नेवून त्याचा गळा आवळून जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देश्याने कपडे काढून चादरीमध्ये गुंडाळून त्याला तलावात फेकून दिले.
 
त्यानंतर तिन्ही संशयित आरोपी घरी निघून गेले. परंतु मयत सुनिल मोरे याला ज्या तलावात मारुन फेकेले होते. तो काही वेळाने नैसर्गिकरीत्या पुन्हा पाण्यावर तरंगू शकतो व आपले बिंग फुटेल या भीतीने मयताचा मृतदेह आरोपींनी दोन ते तिन दिवसांनी पुन्हा पाण्यातून बाहेर काढून त्यास वैंदाणे येथील शेतशिवारात असलेले राखीव वनक्षेत्र असलेल्या पुरातन विहीरीत चादरमध्ये गुंडाळून फेकून दिल्याची कबूली दिली. याप्रकरणी संजय रामभाऊ पाटील (५२), शुभम संजय पाटील (२१), रोहित सुखदेव माळी (२३) तिन्ही रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार यांना अटक केली असून न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. रवींद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी, तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0