सर्वांच्या नजरा डी कॉकवर

29 Oct 2021 17:51:06
 शारजाह : टी-20विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुपर-12 फेरीचा सामना होणार असून या सामन्यात क्विंटन डी कॉककडे सर्वांच्या नजरा असणार आहे. कारण त्याने गुडघ्या टेकण्यास नकार दिल्यानंतर गत सामन्यातून माघार घेतली होती, परंतु आता तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
 

dcock_1  H x W: 
गत सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजवर 8 गड्यांनी विजय मिळविला. डी-कॉकने गुरुवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाच्या उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले. डी कॉकच्या पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीलाही बळकटी मिळेल. कर्णधार टेम्बा बावुमाने आतापर्यंत विश्वचषकात 12 व 2 धावा केल्या असून तो पुन्हा फॉर्म मिळविण्यास अधिक उत्सुक असेल.
दक्षिण आफ्रिकेकडे रीझा हेन्ड्रिक्स, रॅस्सी व्हॅन डर दुस्सेन, अईदेन मार्कराम व भरवशाचा खेळाडू डेव्हिड मिलरसारखे आक्रमक फलंदाजांचा आहे, परंतु या सर्व फलंदाजांना वनिंदू हसरंगा व महेश थेक्षाना श्रीलंकेच्या फिरकी जोडीपासून सावध राहण्याची गरज आहे. या दोघांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चांगलेच पाणी पाजले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने 3 बळी टिपले. तसेच त्यांच्याकडे कॅगिसो रबाडा व अ‍ॅनरिच नॉर्टिज हे दोन सर्वोत्तम डेथ गोलंदाज आहेत. शनिवारी होणार्‍या सामन्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. केशव महाराज व तबरेझ शमसीकडूनही प्रभावी कामगिरीची आशा आहे.
तिकडे श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडावे लागेल आणि नव्याने दमाने सुरुवात करावी लागेल. श्रीलंकेचा चरिथ असलंकाचा जबरदस्त फॉर्मात आहे. यष्टिरक्षक कुसल परेरालासुद्धा मोठी खेळी करावी लागेल. पथुम निसांका व अविष्का फर्नांडो ही सलामी जोडी श्रीलंकेसाठी चिंतेचे कारण ठरेल. भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंला पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल. चमिका करुणारत्ने, दुष्यंत चामिरा व लाहिरू कुमारा हे श्रीलंकेचे वेगवान त्रिकुट दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला रोखण्यासाठी प्रयत्नशील असतील. दवाचा खेळावर कोणताही परिणाम होणार नसला तरी, उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
Powered By Sangraha 9.0