आज भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सराव सामना

20 Oct 2021 16:11:46
दुबई : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा व अंतिम सराव सामना खेळण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची व प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल.
 

cricket_1  H x  
 
सलामीच्या सामन्यासाठी भारताची फलंदाजांची क्रमवारी निश्चित करण्यावर भर असेल. तसेही भारताचे अव्वल फळीतील तीन फलंदाज निश्चित आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा हे सलामीला फलंदाजी करतील, तर कर्णधार स्वतः तिसर्‍या क्रमांकावर असणार आहे, असे कोहलीने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने 7 गड्यांनी विजय मिळविला. या सामन्यात निवृत्त होण्यापूर्वी ईशान किशनने 70 धावांची खेळी करून अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्याचा दावा केला आहे. ऋषभ पंतला (नाबाद 29 धावा) सूर्यकुमार यादवच्या पुढे बढती देण्यात आली व बुधवारी तो कोणत्या स्थानावर फलंदाजी करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रोहितने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली नाही व आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार फलंदाजी करणे अपेक्षित आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो गोलंदाजी करीत नसल्याने संघ व्यवस्थापन त्याला फलंदाज म्हणून खेळविण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भुवनेश्वर कुमार खेळला, परंतु जसप्रीत बुमराह सर्वोत्तम होता. मोहम्मद शमीने तीन बळी टिपले. आता बुधवारी रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर व फिरकीपटू वरुण चक्रवर्तीकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय संघाचा अलिकडचा फॉर्म बघितला, तर भारताने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायभूमीवरील मालिका 2-0 ने गमावल्यापासून भारत सलग आठ मालिकांमध्ये अपराजित आहे. 2016 च्या टी -20 विश्वचषकापासून भारताने 72 टी -20 सामने खेळले व 45 जिंकले.
Powered By Sangraha 9.0