इमरान खानचा पुन्हा सैन्यावर निशाणा आणि राजकीय वाद

    दिनांक : 08-Sep-2022
Total Views |
इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे.
 

pak 
 
 
 
 
भारताबरोबरच पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. पण, या देशाचे दुर्दैव हेच की, या देशातील लोकशाही व्यवस्था अद्याप मजबूत झालेली नाही. पाकिस्तानचे सैन्य ज्याला ‘डीप स्टेट’ म्हणूनही संबोधले जाते, त्यांनी एक शक्तीकेंद्र यंत्रणा विकसित केली आहे, जी लष्करी शासनाव्यतिरिक्त तथाकथित लोकशाही सरकारांच्या कार्याचेही अगदी गंभीरपणे नियमन करते आणि त्यांच्यावर नियंत्रणसुद्धा ठेवते. म्हणूनच कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार सत्तेत असले तरी ते साहजिकच पाकिस्तानी सैन्याविरोधात बोलायला धजावतनाही. असे एकूणच भीतीचे वातावरण पाकिस्तानात आजही कायम आहे. परंतु, गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा थेट लष्कराच्या भूमिकेवरच काही प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे आधीच पूरपरिस्थिती असलेल्या पाकिस्तानात राजकीय टिकाटिप्पण्यांचा महापूर आला आहे.
 
इमरान खान यांनी एका कार्यक्रमात देशाच्या लष्करावर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, “तुम्ही स्वत:ला कितीही तटस्थ म्हणवून घेतले तरी काहीएक फरक पडणार नाही. तुम्ही देशात आजवर केलेल्या (गैर)कृत्यांसाठी इतिहासच तुम्हाला दोषी ठरवेल.” याच कार्यक्रमात बोलताना इमरान खान पुढे म्हणाले की, “मी आज तटस्थ लोकांना विचारू इच्छितो की, तुम्हाला माहिती आहे का देश कुठे चालला आहे? आणि पुढील दोन-तीन महिन्यांत काय होईल, याची साधी कल्पनादेखील नसताना देश आणि अर्थव्यवस्था कशी पुढे जाईल?”
 
उल्लेखनीय म्हणजे, इमरान खान यांचे वरील वक्तव्य हे अशावेळी आले आहे, जेव्हा इमरान खान आणि त्यांचा राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यांच्या विधानाच्या एक दिवस आधी ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) नेते शाहबाज गिल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती. गिल यांनी गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही वाहिनीवर पाकिस्तानी लष्कराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर थपका ठेवण्यात आला होता.
 
गिल यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी लष्कराकडून तीव्र प्रतिक्रिया उमटणे तसे स्वाभाविकच होते. लष्कराने ही टिप्पणी अपमानजनक म्हणून फेटाळून लावली. पाकिस्तानी सशस्त्र दलाची जनसंपर्क शाखा असलेल्या ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ (आयएसपीआर) ने म्हटले आहे की, ‘पीटीआय’ने फैसलाबादमधील एका राजकीय रॅलीदरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल केलेल्या अपमानास्पद आणि अनावश्यक टिप्पणीमुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख नाराज झाले आहेत.” सत्ताधारी ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ (पीडीएम) युतीने या टिप्पणीला लोक आणि लष्कराला एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा आणि सशस्त्र दलाच्या अधिकार्‍यांमधील संघर्षासाठी दरवाजे खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
 
पंतप्रधान शाहबाज शरीफ, ‘पीपीपी’ नेते आसिफ अली झरदारी आणि पाकिस्तानातील इतर अनेक राजकारण्यांनीही गिल यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका ट्विटमध्ये शाहबाज शरीफ म्हणाले की, ‘’पाकिस्तानी सैन्याला बदनाम करण्यासाठी इमरान खान यांची विधाने दररोज नवीन स्तरांना स्पर्श करत आहेत.” इतकेच नव्हे, तर पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रपती आरिफ अल्वी जे इमरान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांनीही गिल यांनी लष्करावर केलेल्या त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
 
इमरान खान यांनी लष्कराच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. इब्न खल्दुन यांनी मांडलेला ‘पाकिस्तानी राष्ट्रवाद’ हा ‘असबिया’ किंवा ’ग्रुप स्पिरिट’वर आधारित आहे, जो मूलत: देशातील एका प्रांतामध्ये राहणार्‍या विविध समुदायांमध्ये असला पाहिजे. त्याचा उपयोग प्रांताद्वारे एकता आणि देशभक्ती जागृत करण्यासाठी केला जातो. पण, पाकिस्तानी राष्ट्रवादाचे दोन विलक्षण पैलू आहेत, ज्यांनी नकारात्मक स्वरुप धारण केले आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोन्ही पैलूंचा हेतू हा देशांतर्गत ऐक्य आणि सौहार्द टिकवून ठेवणे असा आहे. यातील पहिला पैलू म्हणजे भारताविषयी कायमच ’बाह्य शत्रू’ म्हणून भीती निर्माण करणे आणि दुसरा पैलू म्हणजे इस्लाम.
 
फाळणीनंतर भारताबरोबर झालेल्या युद्धांमुळे ते सैन्यापासून पंजाबच्या अधिपत्याखालील उच्चभ्रू लोकांपर्यंत पाकिस्तानमधील राष्ट्रवादाचे हेच पैलू रुजले आहेत. युद्धांमुळे पाकिस्तानी सैन्याला ’राष्ट्रीय प्रशंसे’च्या रूपात एक नवीन आभा प्राप्त झाली आणि ते केवळ नवनिर्मित संस्थाच नव्हे, तर इस्लामचे रक्षक म्हणून जनतेपुढे, देशापुढे सादर केले गेले. ‘पाकिस्तान : अ हार्ड कंट्री’ या पुस्तकात लेखक अनाटोल लिव्हन, पाकिस्तानच्या घडामोडींवर लिहितात की, “तुर्कीमधील सैन्याने पाकिस्तानच्या शक्तिशाली सैन्याप्रमाणेच आधुनिक राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा वापर केला. परंतु, त्यांनी निवडलेला मार्ग प्रगतीऐवजी पाकिस्तानचे स्वतःचे वर्चस्व वाढवत होता. भारताच्या कृत्रिम भीतीवर तो आधारित होता, ज्यामुळे लष्करी आस्थापनांना केवळ राजकीय वर्चस्वच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करता आली.”
 
सैन्य आपले मनोबल आणि शिस्त राखण्यासाठी ज्या राष्ट्रवादावर अवलंबून आहे, त्याने पाकिस्तानला धोकादायक आंतरराष्ट्रीय शत्रुत्व आणि अफगाण तालिबान आणि ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या अतिरेकी गटांबरोबर तितक्याच धोकादायक परिस्थितीत अडकवले आहे आणि ही कुटील रचना विकसित करण्यात खुद्द इमरान खानही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वीच्या गैर-लष्करी सरकारांबरोबरच, पाकिस्तानी लष्कराने जिहादच्या सिद्धांताचा अवलंब करणे आणि या तत्त्वाखाली राज्येतर जिहादी घटकांची निर्मिती आणि विकास करणे, यासाठीदेखील प्रामुख्याने इमरान खान यांना जबाबदार धरले पाहिजे.
 
इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे. लष्करी आस्थापनांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे 2018च्या निवडणुकीत इमरान खान कसे सत्तेवर आले हे तर अगदी सर्वश्रुत आहे आणि लष्कराची ही बेकायदेशीर भूमिका तथाकथित लोकशाही सरकारांनी त्यांच्या निहित स्वार्थासाठी वेळीच ओळखली आणि सध्याच्या आणि भविष्यात पाकिस्तान या लष्कराच्या तावडीतून मुक्त होईल, हे शक्य नाही, असेच दिसते. कारण, लोकशाही व्यवस्थेतील उपजत कमकुवतपणामुळे या व्यवस्थेला खरा आश्रय मिळाला आहे आणि या व्यवस्थेत सुधारणा केल्याशिवाय लष्कराच्या विरोधात काहीही बोलणे, हे केवळ क्षणिक राजकीय फायद्याचे ठरू शकते, पण त्यापलीकडे त्याचा उपयोग मात्र शून्यच...
 
- एस. वर्मा
(अनुवाद : विजय कुलकर्णी)