कित्येक वर्षांपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकणार नाही, असा विक्रम ‘द काश्मीर फाईल्स’ने केला. त्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या कलाकार आणि निर्मात्यांकडे दुर्लक्ष करणार्या हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित पुरस्कार समारंभाला परिपूर्ण कसे मानता येईल? ‘फिल्मफेअर’ने तेच केले आणि म्हणूनच त्या पुरस्कार सोहळ्याला एखाद्या नौटंकीपेक्षा दुसरे काही म्हणता येणार नाही.
67वा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळा संपन्न होताच वादालाही सुरुवात झाली. कारण, यंदाच्या ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळ्याला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या कलाकारांना वा निर्मात्यांना आमंत्रणच देण्यात आले नव्हते. खरे म्हणजे, 15 ते 25 कोटींत तयार करण्यात आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ने तब्बल 340 कोटींचा व्यवसाय केला. आपल्या खर्चाच्या 15 ते 22 पट कमाई करणार्या ‘द काश्मीर फाईल्स’चे यश जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथ्या’च्या उंचीइतकेच! कोरोनाकाळात सर्वच व्यवसायांबरोबर चित्रपटगृहांना, चित्रपटांनाही चांगलाच फटका बसला. त्यानंतर आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ने मात्र ते नुकसान भरून निघण्याची आशा जागवली अन् दिशाही दाखवली. तरीही त्या चित्रपटासाठी काम केलेल्यांवर ‘फिल्मफेअर’ने अघोषित बहिष्कार टाकला अन् त्यातूनच वाद सुरू झाला.
वस्तुतः ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये प्रत्यक्षात न घडलेली एकही घटना दाखवलेली नाही. उलट काश्मीर खोर्यात हिंदूंवर झालेले अन्याय-अत्याचार ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये दाखवलेल्या दृश्यांपेक्षाही अधिक भयानक, अधिक क्रूर, अधिक अमानुष आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ने चित्रपटाच्या तंत्राप्रमाणे ते दाखवले. पण, त्यालाही सुरुवातीला चित्रपटगृह मिळणे मुश्किल झाले. प्रेक्षकांनी मात्र ‘द काश्मीर फाईल्स’ जिथे असेल तिथे जाऊन पाहायला सुरुवात केली अन् जिथे नसेल तिथे फक्त ‘द काश्मीर फाईल्स’ दाखवण्याची मागणी केली. त्यामुळे चित्रपटगृहचालकांनीही नंतर ‘द काश्मीर फाईल्स’ दाखवायला प्राधान्य दिले अन् दिवसेंदिवस त्याच्या पडद्यांची, खेळांची संख्या वाढतच गेली.
एखाद्या चित्रपटाचे लोकचळवळीत रुपांतर झाल्याचे त्या काळात पाहायला मिळाले अन् कित्येक वर्षांपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकणार नाही, असा विक्रम ‘द काश्मीर फाईल्स’ने केला. त्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या कलाकार आणि निर्मात्यांकडे दुर्लक्ष करणार्या हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित पुरस्कार समारंभाला परिपूर्ण कसे मानता येईल? ‘फिल्मफेअर’ने तेच केले आणि म्हणूनच त्या पुरस्कार सोहळ्याला एखाद्या नौटंकीपेक्षा दुसरे काही म्हणता येणार नाही.
‘बेनेट’, ‘कोलमन अॅण्ड कंपनी लिमिटेड’च्या ‘वर्ल्डवाईड’ मीडियाच्या माध्यमातून ‘फिल्मफेअर’नियतकालिकाचे प्रकाशन केले जाते आणि ‘फिल्मफेअर’ पुरस्काराचे आयोजनही. म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीच्या परिघाबाहेरील एक स्वतंत्र माध्यमसंस्था ‘फिल्मफेअर’ पुरस्कार देते, असे यावरुन दिसते. पण, ‘फिल्मफेअर’वर नेहमीच पक्षपात केल्याचा, हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक अभिनेते अन् निर्मात्यांच्या दबावात पुरस्कार दिल्याचा आरोप केला जातो. आता ‘फिल्मफेअर’ने ‘द काश्मीर फाईल्स’शी संबंधित कोणालाही आपल्या पुरस्कार सोहळ्याला बोलावले नाही, यावरून ते आरोप बरोबर असल्याचेच दिसते.
त्यावर, 67वा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळा 2021 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी होता आणि ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाल्याने त्याच्यासाठी काम केलेल्यांना बोलावले नाही, असा दावा ‘फिल्मफेअर’ने केला, पण तो तकलादू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या सोहळ्याला खरेच फक्त 2021 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी संबंधितांना आमंत्रण दिले होते व तेच उपस्थित होते, असे ‘फिल्मफेअर’ सिद्ध करू शकते का? तर नाही आणि यातूनच ‘फिल्मफेअर’ने फक्त ‘द काश्मीर फाईल्स’वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हिंदी चित्रपटसृष्टीच्या दबावाखालीच घेतल्याचे स्पष्ट होते.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट न आवडलेल्यांचा भरणा आहे. त्यामागे हिंदूविरोधाचे अन् मुस्लीमप्रेमाचे कारण आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक वर्षे दाऊद इब्राहिम वा त्याच्या हस्तकांनी बेमालुमपणे अमाप पैसा पुरवलेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी आपल्याला पाकिस्तानबद्दल, दहशतवाद्यांबद्दल, इस्लामी कट्टरपंथी झाकीर नाईकबद्दल किती प्रेम वाटते हे आपल्या कृतीतून, वक्तव्यातून, चित्रपटातून दाखवून दिले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’द्वारे मात्र धर्मांध मुस्लीम जिहाद्यांची असलियत जगासमोर आणली गेली. इतकी वर्षे दाबल्या गेलेल्या काश्मिरी हिंदूंच्या दुःखाला वाचा फोडली गेली.
त्यानेच हिंदी चित्रपटसृष्टीतील इस्लामप्रेमी, हिंदूविरोधी, देशविघातक टोळी बिथरली. म्हणूनच त्यांनी ‘ब्लॉकबस्टर’ ठरलेल्या, सुपर डुपर हिट ठरलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशाबद्दल एका शब्दानेही प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या याच निवडकांनी ‘फिल्मफेअर’वर दबाव आणत ‘द काश्मीर फाईल्स’शी संबंधितांना पुरस्कार सोहळ्याला बोलावू नये, असे सांगितल्याचे दिसून येते. त्यातून आमच्या आवडत्या विचारधारेविरोधात चित्रपट तयार केल्यास तुमच्यावर सर्वत्र बहिष्कारच टाकला जाईल, हा संदेशच त्यांना ‘द काश्मीर फाईल्स’च्या कर्त्यांना द्यायचा आहे. जेणेकरून भविष्यातही कोणी अशाप्रकारचे चित्रपट तयार करू नये.
‘द काश्मीर फाईल्स’साठी देशभरातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी केली, तिकीटे खरेदी केली. पण, त्याच्या यशावर खान गँगने ट्विट केले नाही ना अख्तर, कपूर, चोप्रा वा भट्ट घराण्याने! अनुपमा चोप्रांनी चित्रपटाची निंदानालस्ती मात्र केली, तर आमीर खानने चित्रपटगृहात चित्रपट पाहू असे म्हटले. पण, तशी कृती केली नाही. पण, ‘द काश्मीर फाईल्स’नंतर कोट्यवधींमध्ये तयार झालेले डझनावारी चित्रपट प्रदर्शित झाले. पण, अर्थशून्य कथानक, एकसाची अभिनय पाहून प्रेक्षकांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यातले अनेक चित्रपट स्वतःला हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्वेसर्वा मानणार्यांचे होते, पण तेही आपटले. मात्र, या चित्रपटांना वर उल्लेख केलेल्यांपैकी अनेकांना सर्वोत्कृष्टतेचे प्रमाणपत्र दिले, ते पाहण्याचे आवाहन केले.
अर्थात, प्रेक्षकांनी ते नाकारल्याने त्यांना एका आठवड्यात 50 कोटींचीही कमाई करता आली नाही. पण, या सगळ्यातून हिंदी चित्रपटसृष्टीचा भेसूर चेहराच उघडा पडल्याचे स्पष्ट होते. तसेच ‘द काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांचे आरोपही खरे वाटतात. तो चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बड्या धेंडांनी, ताकदवर लोकांनी घेराबंदी केल्याचे त्यांचे म्हणणे होते. ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही हिंदी चित्रपटसृष्टीतली मोठी नावे निश्चित करतात, असा आरोप केला जातो, त्यात तथ्य असल्याचेही यातून दिसते. पण, हे कुठवर चालणार?
आज हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कारास्त्राचा मारा केलेला आहे. कारण, त्यात भारतीयत्वाचा मागमूस नसतो, इथल्या बहुसंख्यकांच्या भावविश्वाशी त्याचा संबंध नसतो, असते ती फक्त वाईटसाईट टीका. त्यामुळेच नजीकच्या काळात प्रदर्शित झालेल्या सार्याच चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीतल्यांना अन् ‘फिल्मफेअर’ला अक्कल येत नसेल तर ते व त्यांचे चित्रपट, पुरस्काराचे महत्त्व अप्रासंगिक, अस्तित्वहीन व्हायला वेळ लागणार नाही.