महिनाभरापासून तदर्थ डॉक्टरांच्या वेतनाचे ६० लाख प्राप्त होऊनही देण्यास टाळाटाळ
धरणगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कंत्राटी पध्दतीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ४० तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांचे गेल्या सहा महिन्यापासून पगार रखडले आहेत.
शासनाकडून पगारासाठी निधी प्राप्त झाले नसल्याचे कारण देण्यात आले होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवापूर्वी शासकीय कर्मचार्यांना पगार देण्याचे आदेश दिले होते. मात्र जि.प.अंतर्गतच्या तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांच्या पगारासाठीचे दोन महिन्याचे ६० लाख अनुदान महिन्याभरापूवीच जि.प.च्या आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यानंतरही संबंधित तदर्थ डॉक्टरांना पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या आदेशालाच खो देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही भारी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांचे दोन महिन्याचे वेतन शासनाकडून प्राप्त झाले असून त्यांना येत्या दोन दिवसात वेतन अदा करण्यात येईल. - डॉ.पकंज आशिया, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषदे अंतर्गत जनतेच्या आरोग्य सेवेचा विचार करून तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येते. या कर्मचार्यांना मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे वेतन जेवढे वर्ग करण्यात आले. तेवढे तरी वेतन त्यांना श्रीगणेश स्थापने पूर्वी मिळायला हवे होते. मात्र दोन महिन्याचा वेतन निधी महिन्याभरापासून प्राप्त झाल्यानंतरही संबंधित तदर्थ डॉक्टरांना वर्ग करण्यासाठी एवढा विलंब का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जि.प.च्या आरोग्य विभागातील प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख सध्या या विभागाचे कामकाज पाहत आहे. मात्र सध्या त्यांचीं कार्यालयात उपस्थिती अत्यंल्प असते. त्यामुळे आरोग्य विभाग सध्या वार्यावर आहे. महिन्याभरापूर्वीच तदर्थ डॉक्टरांचे वेतन प्राप्त होऊनही दोनच दिवसापूर्वीच त्यांचे दोन महिन्याचे वेतन प्राप्त झाल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख यांनी केला आहे. मात्र वेतन महिन्याभरापूर्वीच शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरही संबंधितांना देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सीईओंपासून वस्तूस्थिती लपविली जात असल्याचे यातून दिसून येते.