अष्टविनायकां पैकी आज आपण चौथा गणपती म्हणजे महडचा वरदविनायका बद्दल माहिती पहाणार आहोत .
रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर हे अष्टविनायक यात्रेतील चौथे स्थान आहे. भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा अशी या बाप्पाची ख्याती आहे.
वरदविनायक:-
इसवी सन १६९० साली धोंडू पौढकर या गणेश भक्ताला स्वप्नांमध्ये देवळाच्या मागे स्थित असलेल्या तळ्यामध्ये ही मूर्ती असल्याचे कळले.
त्यानंतर त्याने तळ्यामध्ये या मूर्तीचा शोध घेऊन त्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे व मूर्तीजवळ एक अखंड दिवा तेवत ठेवलेला आहे. हा दिवा इ.स. १८९२ पासून अखंड तेवत ठेवलेला आहे.
मंदिर:-
इ.स. १७२५ मध्ये सुभेदार रामजी भिवलकर यांनी हे मंदिर उभे केले. हे मंदिर कौलारू आहे व मंदिराच्या घुमटाला सोनेरी कळस आहे. तसेच या देवळाच्या चारही दिशांना हत्तीची प्रतिकृती साकारली आहे.
आख्यायिका:-
राजा भीम व त्याच्या पत्नीला श्री गणेशाच्या कृपेने रुक्मंद नावाच्या पुत्र प्राप्त झाला. राजा रुक्मंद एकदा अरण्यात शिकारीसाठी गेला असताना ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात विश्रामासाठी गेला होता. तेव्हा ऋषी वाचक्नवींची पत्नी मुकुंदा राजाच्या प्रेमात पडली. परंतु राजाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही व तो तिथून निघून गेला.
इंद्रदेवाला ही गोष्ट कळल्यावर तो रूक्मंदाचे रूप घेऊन मुकुंदाकडे गेला व इंद्रदेवांपासून मुकुंदाला ग्रित्सम्द नावाचा पुत्र प्राप्त झाला. ग्रित्सम्दाला त्याच्या जन्माबद्दल सत्य समजल्यानंतर त्याने आईला शाप दिला व स्वतः पापक्षालन करण्यासाठी जंगलात निघून गेला.
तेथे त्याने श्री गणेशाची प्रार्थना करत घोर तपसाधना केली. त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन त्याला वर दिला व ग्रित्सम्दाने गणपतीला तेथेच राहून भक्तांचे विघ्न दूर करण्याची विनंती केली.