मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आज बुधवारी (Lata Mangeshkar Award) भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण रवींद्र नाट्यमंदिरात करण्यात आले. 2020चा पुरस्कार उषा मंगेशकर आणि 2021चा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.
गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या (Lata Mangeshkar Award) पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार आशिष शेलार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मीना खडीकर, पद्मश्री सोनू निगम, आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा, पंकज उधास, रूपकुमार राठोड, तबलावादक तौफिक कुरेशी, संगीतकार ललित उपस्थित होते.
लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे लोकार्पण
यावेळी भारतरत्न (Lata Mangeshkar Award) लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उषा मंगेशकर, पंडित हरिप्रसाद चोरसिया, मीना, खडीकर, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.