जळगाव: मुक्ताईनर तालुक्यातील कुंडी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या महिलेची हत्या करुन मृतदेह प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन फेकण्यात आला होता. त्याचा तपास लागला असून खून झालेल्या महिलेची ओळख पटली आहे.
प्रभा माधव फाळके (६३) असे मयत महिलेचे नाव असून त्या मलकापूर नगरपरीषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या खूनाच्या घटनेचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दागिन्यांसाठी या महिलेचा तिच्या शेजारी राहणाऱ्या दोघा बापलेकांनी खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास भास्कर गाढे (५०) आणि भार्गव विश्वास गाढे (२१, रा.गणपतीनगर, मलकापूर) असे अटकेतील दोघा संशयितांचे नावे आहेत. वडिलांना दारूचे व्यसन आहे. तसेच तरुणावरही 50 हजार रुपयांचे कर्ज होतं. वडिलांनी दारूच्या नशेत शनिवार, दि.27 ला प्रभा फाळके यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करत अंगावरचे दोन लाखांचे सोने काढून घेतले. त्यानंतर मृतदेह पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकून दिला, अशी कबुली भार्गव याने पोलिसांकडे दिली आहे.
प्रभा माधव फाळके शनिवार, दि.27 ऑगस्ट रोजी परीसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या परंतु त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही. याबाबत त्यांचा मुलगा रीतेश फाळके याने मलकापूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. मलकापूर पोलिसांनी मृत महिलेचे फोटो फाळके परिवारास दाखवले असता, या महिलेची ओळख पटली. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, मुक्ताईनगर पोलीस निरिक्षक शंकर शेळके हे पथकासह मलकापूर शहरात दाखल झाले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन फाळके यांच्या घराशेजारी राहणाऱ्या विश्वास भास्कर गाढे आणि भार्गव विश्वास गाढे या दोघांना ताब्यात घेतले. मृत प्रभा फाळके या ज्या रस्त्याने केल्या होत्या, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, यासह मलकापुरातील मुथुट गोल्ड फायनान्स येथील माहिती या सर्व पुराव्यांच्या आधारावर प्रभा फाळके यांचा खून भार्गव गाढे तसेच त्याचे वडील विश्वास गाढे यांनी केल्याचे निष्पन्न झाले.