जळगाव : शहरातील प्रसिद्ध रोहिणी स्वीट आणि विभागानमकीन या मिठाईच्या दुकानावर फूड आणि ड्रग्ज (एफडीए) विभागाद्वारे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील महाबळ रोड वरील रोहिणी स्वीट आणि नमकीन या मिठाईच्या दुकानावर एफडीए विभागाचे जळगाव येथील सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी महाजन मॅडम यांच्या टीमने धाड टाकून थेट कारवाई केली. येथील दुकानात कोठेही कोणत्याही मिठाईवर एक्सपायरी डेट (खाद्य पदार्थाची वापरण्याची अंतिम तारीख) टाकलेली दिसून आली नाही, म्हणुन दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी सांगितले.
कोणत्याही मिठाईच्या दुकानात प्रत्येक खाण्याच्या वस्तुवर पदार्थ वापरण्याची तारीख (युज बिफोर युज अप टू) सर्वांना दिसेल अश्या पद्धतीने स्पष्ट लावणे आवश्यक असते . मात्र रोहिणी स्वीटच्या दुकानात कोठेही अशी तारीख लावलेली नव्हती. त्यामुळे खाण्यास योग्य नसलेले किंवा मुदत संपलेले पदार्थ ग्राहक विकत घेऊ शकतात. रोहिणी स्वीट आणि नमकीनचे मालक केसाराम चौधरी यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कारवाई करणाऱ्या टीमने येथील ईमरतीचे नमुने देखील तपासणी साठी जमा केले आहे. या ईमारती मध्ये अनावश्यक आणि दूषित रंग असल्याचा संशय एफ डी ए अधिकाऱ्यांना आहे. रोहिणी स्वीट आणि नमकीन वर दोन लाखापर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते.
दरम्यान कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करण्याच्या पूर्वी नागरिकांनी त्या खाद्यपदार्थावर तो पदार्थ वापरण्याची अंतिम तारीख, अर्थात एक्सपायरी डेट नमूद केलेली आहे की नाही हे पाहणे गरजेचे असून तारीख नसल्यास त्याबाबत दुकानदाराला योग्य ती विचारपूस करून मगच तो पदार्थ खरेदी करण्यात यावा. सणासुदीच्या काळात अशा खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतः याबाबत जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त ससंदीप पतंगे यांनी केले आहे.