अशीही पोलीसगिरी...‘काम सरो अन् वैद्य मरो’!जिल्हापेठ पोलिसांनी वाजवून घेतला डी.जे.; नंतर त्यावरच कारवाई

    दिनांक : 02-Sep-2022
Total Views |
जळगाव : गणेशोत्सवादरम्यान ‘श्रीं’ची स्थापना करण्यासाठी एका गणेश मंडळाला डी.जे.वाजवून देण्यास सांगितले. यानुसार मंडळाकडून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एक ते दीड तास डी.जे. वाजवून मोठ्या थाटामाटात स्थापना केली. मात्र त्याच गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह डी.जे.जप्त करीत दंड वसूलीची कारवाई जिल्हा पेठ पोलीस प्रशासनाने केली.
 
DJ _ Police Dance
 
शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘श्रीं’ मिरवणूक शिवाजीपुतळयाजवळ होती. या मंडळाला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील गणेश स्थापनेसाठी डी.जे वाजवून देण्यासाठी पोलिसांनी विनंती केली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात श्रींची स्थापना करीत एक ते दीड तास डी.जे.च्या तालावर पोलीस बांधव थिरकले.
 
मात्र शिवाजी पुतळ्याजवळ्याजवळ त्याच मंडळाचा डी.जे. जप्त करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी दंडात्मक कारवाई केली. परंतु याच मंडळाकडून श्रींच्या स्थापनेसाठी डी.जे. वाजवून घेतला हे जिल्हा पेठ पोलिसांनी अपर अधीक्षक चिंथा यांना सांगितलेच नाही. अशी तक्रार चिंतामणी गणेशोत्सव मंडळ अध्यक्षांनी केली.
 
चिंतामणी गणेश मंडळासाठी मनपा तसेच पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली असून भुसावळ येथून डी.जे. मागविला होता. मिरवणूक शिवाजीपुतळ्याजवळ असतांना जिल्हा पेठ पोलिसांकडून श्रींची स्थापना करून देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एक ते दीड तास डी.जे वाजवत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. मात्र शिवाजीपुतळ्याजवळच मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढतेवेळी अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी डी.जे. जप्त करीत पदाधिकार्‍यांना त्यांच्या पोलीस व्ह्ॅनमधून जिल्हा पेठला नेले. यात दीड हजार रूपये दंड वसूल केल्यानंतर डी.जे. सोडण्यात आला.
 
- राहुल ठोसर, अध्यक्ष, चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, जळगाव