अष्टविनायका पैकी तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर

    दिनांक : 02-Sep-2022
Total Views |
अष्टविनायकांपैकी आज आपण तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर बद्दल माहिती पहाणार आहोत .
 

ballaleshwar 
 
 
 
रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो.
 
पूर्वाभिमुख श्रीगणेशाची हि मूर्ती अरुंद असून तिचे कपाळ मोठे आहे. तसेच सोंड डाव्या दिशेला वळलेली आहे आणि मूर्तीच्या डोळ्यात व नाभीत हिरे जडविलेले आहेत. या मूर्तीच्या मागच्या बाजूला चंदेरी महिरप आहे व त्यावर रिद्धी-सिद्धी यांची कलाकृती साकारली आहे.
 
मंदिर:-
 
सध्या पाली येथे स्थित असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. व तिथल्या लाकडी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले. या ठिकाणी सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात म्हणजेच हिवाळ्याच्या काळात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात.
 
आख्यायिका:-
 
त्रेता युगामध्ये कल्याण नावाचा वाणी त्याच्या पत्नीसमवेत या गावी राहत होता. कालांतराने त्यांना बल्लाळ नावाचा पुत्र झाला. बल्लाळ हा लहानपणापासूनच निस्सीम गणेशभक्त होता. त्याची व त्याच्या मित्रांची गणेशावर अपार श्रद्धा होती. हे सर्व जण गणेश भक्तीमध्ये तल्लीन होऊन तहान भूकही विसरून जात असत.
 
ते जंगलामध्ये एका धोंड्याला गणपती स्वरूप मानून पूजा करीत असत.‌ त्यामुळे एके दिवशी बल्लाळ हा आपल्या मुलांना बिघडवत आहे अशी तक्रार घेऊन गावकरी कल्याण वाण्याकडे गेले होते. व त्यामुळे संतप्त झालेला कल्याण रागाने बल्लाळला शोधण्यासाठी जंगलात निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने तिथली पूजा उधळून लावली तसेच गणपती म्हणून पुजलेला धोंडाही फेकून दिला.
 
तिथली बाकीची मुले पळून गेली पण बल्लाळ मात्र नामस्मरणात व्यस्त होता. पण चिडलेल्या कल्याणने कोणताही विचार न करता बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले व तिथल्याच एका झाडाला बल्लाळला बांधून तो तिथून निघून गेला. तेव्हा बल्लाळने मनाशी ठरवले की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत गणेशाचा जप चालू ठेवायचा.
बल्लाळ ची निस्सीम भक्ती पाहून गणपती ब्राह्मणाचा अवतार घेऊन त्याच्याजवळ आला. गणपतीने स्पर्श करताच बल्लाळच्या शरीरावरील सर्व जखमा नाहीशा झाल्या व त्याचे शरीर पुन्हा आधी सारखे झाले प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला वर मागण्यास सांगितले.
 
तेव्हा बल्लाळाने इच्छा व्यक्त केली की गणपतीने इथेच राहून भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा गणपतीने बल्लाळला वचन दिले कि, “माझा एक अंश इथे कायम वास्तव्य करेल व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल तसेच इथले माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून ओळखले जाईल”.असे म्हणून गणपती जवळच्या एका शिळेत अंतर्धान पावला.