जळगाव : पारोळा तालुक्यात मंगळवारी (ता.१३) सायंकाळच्या सुमारास झालेल्या (Heavy Rain) मुळधार पावसामुळे मुंदाणे प्र.अ, करंजी बु., मोंढाळे प्र.अ. व दळवेल परिसरात सुमारे 79 मिलिमीटर पाऊस झाल्याने पिकांसह परिसरातील झाडे कोलमोडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाहाकार केलेल्या पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिसकावल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून (Jalgaon) पावसाने उघडीप दिली होती. काही प्रमाणात पाऊस येईल. या आशेने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस सुरूवात केली होती. यावर्षी समाधानकारक पीक येईल या आशेने शेतकरी शेतात कुटुंबासह राबत होता. अनेक शेतकऱ्यांच्या मे महिन्याचा कापूस (Cotton) पितृपक्षात उन्हामुळे फुटण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या तीन– चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे आता तोंडाशी आलेला कापूस हा 13 सप्टेंबरच्या झालेल्या पावसामुळे जमीनदोस्त झाली.
पिके पाण्याखाली
परिसरातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळल्याचे बोलले जात आहे. या जोरदार पावसामुळे परिसरातील छोट्या नाल्यांना पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे परिसरातील झाडे विजेच्या तारा जमिनीवर आल्या होत्या. दरम्यान कापूस बरोबर कडधान्य तूर, उडीद, मुंग हे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. दरम्यान या परिसरात महसूल विभागाने त्वरित पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठवावा; अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.