रत्नागिरी: शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी असणाऱ्या साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. म्हणून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी दापोली (Dapoli) न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली होती. यावेळी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी असे आदेश न्यायालयाने दिले. सोबतच दापोली पोलिसांनी पुढील तीस दिवसात या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करावा असेही आदेश दापोली न्यायालयाने दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू केली आहे. रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडून जाहीर निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान या रिसॉर्ट प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी दापोली कोर्टात सोमवारी, १२ सप्टेंबरला सुनावणी झाली. यावेळी दापोली कोर्टाने दापोली पोलिस निरीक्षकांना याप्रकरणी चौकशी करुन पुढील तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याचे वकील एड. प्रसाद कुवेसकर यांनी दिली. यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी सीआरझेड-३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्याने हा दावा दापोली कोर्टात दाखल केला आहे. साई रिसॉर्टचा आरोप असलेले शिवसेना नेते अनिल परब, साई रिसॉर्ट आणि सी काँच या तिघांविरुद्ध हा फौजदारी खटल्याचा दावा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गेले वर्षभर केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हे रिसॉर्ट तोडावे तसेच अनिल परब यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी वेळोवेळी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळयांचे साई रिसॉर्ट हे स्मारक तुटणार आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल परब यांना द्यावी लागतील असा इशारा सोमय्या यांनी दिला होता.
अवघ्या राज्यात बहुचर्चीत आणि वादग्रस्त ठरलेल्या अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या साई रिसॉर्ट तसेच सी काँच रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु झाली आहे. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मौजे मुरुड ता. दापोली येथील स. नं. ४४६ मधील साई रिसॉर्ट एनएक्स आणि सी. काँच रिसॉर्ट बांधकाम व इमारती करिता पुरविलेल्या सोईसुविधा निष्कासन करणे व त्यानुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर सामग्री योग्यरितीने गोळा करून विल्हेवाट लावणेसाठीचे व वापरात येणाऱ्या साहित्यांचे मूल्यांकन करणे, तसेच स.नं. ४४६ मध्ये अस्तित्वात असलेल्या इमारती व इतर बाबी सविस्तर नकाशे (Drawing)५ प्रतीत तयार करुन त्याला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे याकरिता योग्य त्या सल्लागाराची नियुक्ती करणेकरीता दरपत्रक मागविण्यात आले आहे.