रमेश पतंगे
आपल्या विश्वासू सहकार्यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे. अशा समान गुणधर्मींना एकत्र घेऊन ‘नितीश कुमार बिहाने चले पालकी सजाई के!’ राहुल गांधी यांच्या यात्रेचे शीर्षक आहे, ‘भारत जोडो.’ रस्त्यावरील माणूस विचारतो, “भारत कब बिखरा हुआ था?” भारत म्हणजे ‘फेविकॉल’चा जोड आहे. त्याला तुम्ही जोडणारे कोण? खरं म्हणजे तुम्हाला ‘काँग्रेस जोडो’ यात्रा काढायला पाहिजे.
दक्षिणेतून राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा घेऊन निघाले आहेत आणि उत्तरेतून नितीश कुमार ‘पीएम की गद्दी मिलाव’ची यात्रा घेऊन निघाले आहेत. राहुल गांधी यांचा उद्देश ‘पीएम’ यांची ‘गद्दी’ मिळविण्याचाच आहे व नितीश कुमार यांचा उद्देशही तोच आहे. या दोन यात्रांचा मिलाफ कुठे होणार, कसा होणार आणि त्याचे परिणाम काय असतील, हे कुणी अचूकपणे सांगेल का? प्रशांत किशोर कदाचित सांगू शकतात. म्हणून त्यांना विनंती अशी की, त्यांनी या दोन यात्रांचे भाकीत करावे.
नितीश कुमार यांची यात्रा प्रारंभ झाल्यानंतर मला हिंदीतील भगवान शंकराच्या विवाहाचे एक गीत आठवले. त्याचे पहिले कडवे असे आहे,
‘शिव जी बिहाने चले,
पालकी सजाई के,
भभूति रमाई के हो राम,
संग संग बाराती चले,
ढोलवा बजाई के,
घोडवा दौडाई के हो राम,
शिव जी बिहाने चले,
पालकी सजाई के,
भभूति रमाई के हो राम,’
या कडव्यातील ‘शिव जी बिहाने’च्या जागी ‘नितीश कुमार पीएम बनने चले’ असे शब्द टाकून पुढील गीत वाचावे. नितीश कुमार यांनी सेक्युलॅरिझमची विभूती अंगाला फासली आहे. त्यांच्या वरातीत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, अशी सर्व मंडळी सामील झालेली आहेत. भक्तगण ढोल वाजवत आहेत. घोडे दौडत आहेत. अशी नितीश कुमार यांची पालखी सजलेली आहे. वर नितीश कुमार आणि त्यांचे सर्व वराती यांची राजकीय विश्वासार्हता किती आहे? नितीश कुमार भाजपशी मैत्री करून निवडणूक लढवून मुख्यमंत्री झाले. आता त्यांनी भाजपची साथ सोडली आणि ज्या लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव याच्याशी हातमिळविणी केली आणि भाजपला बाजूला सारले. असे त्यांनी एकदा केलेच होते.
अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाग घेतला आणि नंतर त्यांनी अण्णांनाच गांधी टोपी घातली, स्वत:च्या डोक्यावर आपची टोपी बसविली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. विश्वासघात हा नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील समान धागा आहे.ममता बॅनर्जी काँग्रेसच्या बंगाली नेत्या होत्या. गांधी परिवाराशी त्यांचे निकटचे संबंध होते. बंगालमधील काँग्रेसी नेत्यांशी त्यांचे जमले नाही. सोनिया गांधी त्यांच्यामागे ठामपणे उभ्या राहिल्या नाहीत. त्यांनी काँग्रेस सोडून दिली आणि स्वत:ची तृणमूल काँग्रेस उभी केली. ज्या परिवारात आपण वाढलो त्या परिवाराला आपण सोडणे हा नितीश आणि ममता यांचा समान गुणधर्म आहे.
बारामतीचे शरद पवार त्यांच्या भक्तांच्या दृष्टीने जागतिक नेते आहेत. त्यांनी वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करून पुलोद सरकार बनविले. पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. सोनिया गांधी यांचा कालखंड सुरू झाल्यांनतर ‘विदेशी सोनिया’ या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आपल्या विश्वासू सहकार्यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे.अशा समान गुणधर्मींना एकत्र घेऊन ‘नितीश कुमार बिहाने चले पालकी सजाई के!’ राहुल गांधी यांच्या यात्रेचे शीर्षक आहे, ‘भारत जोडो.’ रस्त्यावरील माणूस विचारतो, “भारत कब बिखरा हुआ था?” भारत म्हणजे ‘फेविकॉल’चा जोड आहे. त्याला तुम्ही जोडणारे कोण? खरं म्हणजे तुम्हाला ‘काँग्रेस जोडो’ यात्रा काढायला पाहिजे. रोज कुणी ना कुणी तरी काँग्रेस सोडून चालले आहे. महाराष्ट्रात अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, काँग्रेस सोडण्याच्या रांगेत उभे आहेत. असे प्रत्येक राज्यात अनेक नेते आहेत. म्हणून राहुल गांधी यांनी ‘काँग्रेस जोडो’ अशी यात्रा काढायला पाहिजे. त्यांच्या सल्लागारांच्या बुद्धीला सलाम केला पाहिजे. हा सगळा राजकीय तमाशा बघितल्यानंतर मला अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडर रूझवेल्ट यांच्या २६ जानेवारी १८८३साली झालेल्या भाषणाची आठवण झाली. भाषणाचे शीर्षक आहे, ‘अमेरिकन नागरिकांची कर्तव्ये’ हे जबरदस्त भाषण आहे.
आपल्या विषयाच्या संदर्भात त्यातील काही विचार अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे ते थोडक्यात येथे बघूया. नागरिकांच्या कर्तव्यांविषयी थिओडर म्हणतात, “राजकारणात स्थान मिळवायचे असते. परंतु, हे स्थान आपल्या ठाम भूमिकेच्या बदल्यात मिळवून चालत नाही आणि मिळविलेले स्थान ठाम भूमिकेला तिलांजली देऊनही राखणे गैर आहे. राजकारणात आपले कर्तव्य मला कोणते स्थान मिळणार आहे, यावर ठरवून चालत नाही. आपल्या देशाच्या दृष्टीने ज्यांनी भरीव काम केले, असे नागरिक कुठल्याही पदावर राहिले असे नाही. नागरिकांनी राजकीय लोकांच्या इच्छा काय आहेत, यावरून आपले कर्तव्य कोणते हे ठरवू नये. परंतु जेव्हा त्यांच्या इच्छेविरूद्ध जाऊन कर्तव्याचे पालन करावे लागले तर ते केले पाहिजे. राजकारण्यांचा आवाज म्हणजे परमेश्वराचा आवाज नव्हे. आणि जर तो सैतानाचा आवाज असेल तर त्याच्या विरोधात जाऊन उभे राहणे हे प्राथमिक कर्तव्य ठरते. वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची संकटे उभी करतात.”
आपल्या देशामध्ये पंतप्रधानाच्या खुर्चीवर लक्ष ठेवून ज्यांचे राजकारण चालते, असे राजकीय नेते खूप आहेत. वर त्यांची काही नावे दिली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि मंत्रिमंडळात मंत्री असताना ठाकरे पिता-पुत्रांनादेखील भविष्यकाळातील पंतप्रधानपदाची स्वप्ने पडली. असे सर्व राजकारणी देशाला काय हवं, देशाची अस्मिता कशात आहे, देशाची कर्मशीलता, उद्यमशीलता, बुद्धीसामर्थ्य, कसे वाढविता येईल, याबद्दल काहीही विचार करीत नाहीत. तसा विचार करण्याची त्यांची कुवतही नसते. मला काय मिळणार आहे आणि मला काय मिळवायचे आहे, एवढाच विषय त्यांच्यापुढे असतो. त्यासाठी ते सेक्युलॅरिझमची विभूती अंगाला फासतील, सोयीच्या टोप्या डोक्यावर घालतील, देशद्रोह्यांच्या कबरींना सुशोभित करतील.
अशा वेळी आपण काय करायचे? थिओडर रूझवेल्ट यांचे विचार अमलात आणले पाहिजेत. भारत ही कर्तव्यभूमी आहे. तिचे पुजारी आपण बनले पाहिजे. राजपथाचा कर्तव्यपथ झाला. त्या कर्तव्यपथावरून आपण चालत राहिले पाहिजे. हे विसरता कामा नये की, एक भारतीय म्हणून माझे वय दहा हजार वर्षांचे आहे. आणि या दहा हजार वर्षांत राजधर्माचे पालन कसे करायचे, याचे महान आदर्श आपल्या असंख्य राजांनी घालून दिलेले आहे. या कर्तव्यपथावरून कर्तव्यभूमीची सेवा करणारे कोण आहेत, त्यांच्यामागे उभे राहणे म्हणजेच नागरिकाचे प्राथमिक राजकीय कर्तव्य पार पाडणे होय. केवळ सत्ता, मुख्यमंत्रिपद, पंतप्रधानपद, याचीच हाव धरून वाट्टेल ते राजकारण करणारी पिढी आता आपण सर्वांनी पूर्णपणे टाकून द्यायला पाहिजे. नागरिक म्हणून ज्याच्याकडे बुद्धीमत्ता आहे, आधुनिक विज्ञानाचे ज्ञान आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्या भारतभूमीत फार खोलवर गेले आहेत, अशांनी पुढे आले पाहिजे. राजकारणात सक्रिय झाले पाहिजे. सतत पैसा खाणारे, वाट्टेल त्यांची संगत करणारे आणि देशबुडवे राजकारण करणारे आम्हाला नकोत, हा संकल्पच सत्तेच्या यात्रा रसतळाला नेतील.