‘मी, मनु आणि संघ’च्या रौप्य महोत्सवानिमित्ताने...

    दिनांक : 09-Aug-2022
Total Views |
आज दि.९ ऑगस्ट रोजी ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ विचारवंत आणि समाजचिंतक रमेश पतंगे यांचा जन्मदिवस आणि त्यांचे समरसतेचा अध्याय मांडणारे, सामजिक क्रांती करणारे ‘मी, मनु आणि संघ’ हे १९९६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने या पुस्तकात रमेश पतंगे यांनी मांडलेले व्यापक विचार आणि त्यांची समरसतेची शिकवण यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 

manu 
 
 
 
 
आम्ही काय कुणाचे खातो रे
तो रघुनाथ आम्हाला देतो रे
 
समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचे शतश वास्तवात अस्तित्व म्हणजे रमेश पतंगे सरांचे साहित्य. ”संघ हा मनुवादी आहे, ब्राह्मणवादी असून आपल्या म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे हे मारेकरी आहेत,” तर असे जे जे कुणी म्हणते, त्यांना सप्रेम भेट देण्यासाठी पतंगे सरांचे ’मी, मनु आणि संघ’ हे पुस्तक एक पर्वणीच आहे. आणीबाणीच्या काळात तुरूंगात समाजवादी आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक एकाच बराकीत राहत असत. त्यावेळी समाजवादी कार्यकर्ते संघाला ‘मनुवादी’ म्हणून उगीचच वाद घालतात, म्हणून एका स्वयंसेवकाने मनुस्मृतीमध्ये काही ठिकाणी कसे चांगले लिहिले आहे, याचे भाषण तयार केले.
 
आज कोण स्वयंसेवक कोणता विषय मांडणार आहे, असे वरिष्ठ संघ स्वयंसेवकाने विचारताच त्यांना कळते की, एक स्वयंसेवक मनुस्मृतीच्या समर्थनार्थ आज विषय मांडणार आहे. त्यावर भाषण सत्राची जबाबदारी असणारे संघ स्वयंसेवक स्पष्ट शब्दात सांगतात, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर तुला हा विषय मांडता येणार नाही.’ १९७६ साली तुरूंगात, तेही काही लोकांसमोरही मनुस्मृतीला नाकारणारे संघ स्वयंसेवक आणि त्यांचे विचार. तरीही ‘मनुवादी’ म्हणून संघावर टीका करणारे काही लोक आहेत. काय आहे मनु? खरंच संघ मनुवादी आहे का? या प्रश्नाने पतंगे सरांच्या मनाचा ठाव घेतला.
त्यातूनच ते मनुस्मृती वाचतात, सर्वच महामानवांची चरित्रंही वाचतात. मनुस्मृती ही आपली प्रेरणा असूच शकत नाही. जातभेद समर्थन करणारी यंत्रणा ही कालबाह्य असून तिचे समर्थन करणे म्हणजे हिंदू समाजाचे नुकसान करणे, या निष्कर्षावर ते येऊन ठेपतात. हा सगळा वैचारिक घालमेलीचा प्रवास आणि त्यातून उभी राहिलेली समरसतेची अमूल्य कार्यगाथा या पुस्तकात वाचायला मिळते.
 
या पुस्तकात व्यक्ती म्हणून केवळ रमेश पतंगे सरांचाच वैचारिक कार्यप्रवास मांडला गेला आहे, असे नाही, तर त्या काळात पतंगे सरांच्या सोबत सहविचारी आणि सहकारी असलेले मोहन गवंडी, दादा इदाते, सुखदेव नवले आणि गिरीश प्रभुणे, रमेश पांडव यांच्याही वैचारिक कार्याचा आढावा सहजपणे मांडला गेला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनात ‘समरसता मंच’चा उदय आणि त्याचे कार्य याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे हे पुस्तक. सामाजिक समरसताच का? समता का नाही? यावर दत्तोेपंत ठेंगडी यांनी दिलेले उत्तर असो की, सामाजिक समरसतेचे कार्य काय, यावर दामुअण्णा दाते यांचे उद्बोधक विचार या पुस्तकात पतंगे सर अगदी तपशीलवार मांडतात.
 
महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या पटलावर सामाजिक समरसतेसाठी समाजाच्या ऐक्यासाठी काम करणार्‍या प्रत्येक विचारवंत आणि कार्यकर्त्यांसांठी हा तपशील खूप मोलाचा, पथदर्शी आहे. रा. स्व. संघाच्या शाखेत काय शिकवतात? प्रत्येक स्वयंसेवकाची देशनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी इतकी नि:स्पृह, नि:स्वार्थी का असते? स्वयंसेवकाच्या कुटुंबातील गृहिणी सहजरित्या संघ कार्याशी कशी जोडली गेलेली असते, कुणालाच कुणाची जातपात माहिती नसतानाही सगळेच केवळ रा. स्व. संघ, देश, समाजाच्या विचारांनी कसे समरस असतात, हे या पुस्तकातूना वाचायला मिळते. विमल केडीया आणि पतंगे सरांच्या मैत्रीचे काही संदर्भही आहेत.
 
त्यातूनही रा. स्व. संघाची समरस भूमिका उलगडत जाते. विद्रोही आत्मकथेत तमाम लेखकांनी लिहिलेली कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती जी होती, तीच परिस्थिती पतंगे सरांनी अनुभवलेली. पण, या परिस्थितीचे खापर पतंगे सर दुसर्‍यांसारखे जातव्यवस्थेवर फोेडत नाहीत, तर ते भोगलेल्या दुःखाचे विश्लेषण करतात. जातीमुळे नाही, तर वडिलांनी वडिलोपार्जित व्यवसाय नीट केला असता, तर गरिबीचे तीव्र चटके बसले नसते, असे ते सहज म्हणतात.
‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाचा आजच्या काळातला संदर्भ काय? तत्कालीन सामाजिक आणि राजकीय पेचप्रसंगाचे विवरण करताना पतंगे सरांनी जी स्वतःची मत मांडलीत, ती आज किती कालसुसंगत आहेत, हे जाणवत राहतं. आज महाराष्ट्रात जे प्रमुख राजकीय पक्ष आणि विचारांचा थाट मांडणारे ‘इझम’ आहेत, त्या सगळ्यांबाबत पतंगे सर या पुस्तकात अतिशय तटस्थपणे मत व्यक्त करतात.
 
‘चुकीला माफी नाही’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. पतंगे सरांच्या साहित्यविश्वातही खोटारडेपणा, दांभिकतेला माफी नाही. असे करणारे कोणीही असो, त्यांना निर्भयपणे झोडपल्याशिवाय पतंगे सरांची लेखणी थांबतच नाही. त्यामुळे ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. विशेष उदाहरण द्यायचे, तर साने गुरूजींनी संघाच्या शाखेबाबत लिहिले होते की, संघाला सशस्त्र सैनिक तयार करून या देशाची सत्ता हस्तगत करायची आहे. इतकेच नाही, तर संघाबद्दल अतिशय विद्वेशी विचार सानेगुरूजींनी मांडले.
 
साने गुरूजींनी संघाविषयक मांडलेले अतिशय विद्वेषी विधानांची जंत्रीच देत पतंगे सर या पुस्तकात लिहितात की, “जगाला प्रेम अर्पावे असे विचारणारे साने गुरूजी संघ स्वयंसेवकाबद्दल इतकी विद्वेषी भूमिका का मांडत होते?” तर ना. ग. गोरे यांनी तळजाई येथील संघ शिबिराबाबत अतिशय तर्कहीन, हिणकस विधानं केली ती अशी की, शिबिराला जमणार्‍या 30-35 हजार संघवाल्यांनी मागासवर्गीयांच्या घरावर शस्त्र घेऊन हल्ला केला नाही म्हणजे झाले. ना. ग. गोरे यांच्या विधानांचाही समाचार पतंगे सर या पुस्तकात घेतात.
 
महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात ‘रिडल्स’ आणि ‘नामांतर’ या दोन घटनांचा प्रभाव पडला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीत दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ‘रिडल्स’ प्रकरण कशाप्रकारे पेटवले गेले, त्यामध्ये माधव गडकरी यांचे ‘रिडल्स’संदर्भातील लेख कसे प्रकाशित झाले, ते जाणत्या राजाच्या इशार्‍याने कसे लिहिले गेले, हे या पुस्तकात तटस्थपणे लिहिले गेले. १९९६ साली महाराष्ट्रात प्रतिथयश प्रसारमाध्यमे, त्या वर्तुळातील संपादक आणि तत्कालीन महाराष्ट्राचे राजकीय शक्तिस्थान शरद पवार यांच्या विरोधात जाऊन आपले मत प्रखरपणे लिहिणे, हे केवळ पतंगे सरच करू शकतात.
 
नामांतराच्या वेळेसही नामांतर दंगलीला आणि समाजात पसरलेल्या विद्वेषाचे जबाबादार कोण, याचा सांगोपांग अगदी आखोदेखा हाल पतंगे सर मांडतात. या दोन्ही आंदोलनात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम राहून ‘रिडल्स’ आणि ‘नामांतर’ लढ्याला सर्वार्थाने समर्थन करणारा केवळ आणि केवळ रा. स्व. संघ होता. काँग्रेस आणि तत्कालीन शिवसेना ‘रिडल्स’ आणि नामांतराच्या विरोधात होती. त्यावेळी आंबेडकरी विचारांची धुरा वाहिली ती केवळ समरसतेची कावड वाहणार्‍या संघ कार्यकर्त्यांनी! याचे प्रत्यक्षदर्शी म्हणून पतंगे सर मांडणी करतात. त्यावेळी त्यांना पडलेला प्रश्न आजही अनेकांना पडतो की, असे असतानाही काही ढोंगी लोक शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत रा. स्व. संघाला मनुवादी का म्हणतात?
या असल्या ढोंगी आणि सामाजिक एकतेच्या दुधात विद्वेषाचे मीठ टाकणार्‍या लोकांच्या तत्कालीन कारवायाही यात येतात. गंगाधर पानतावणेसमरसता मंचच्या व्यासपीठावर आले म्हणून त्यांना महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळावरची जाहीर झालेली नियुक्ती काढली गेली. त्यांना नकोसे केले गेले. शरद पवार आणि साहित्य क्षेत्रात मोक्याच्या जागा अडवून बसलेली मंडळी यांचे यथासांग चरित्र या पुस्तकात दिसते.
 
मळलेल्या वाटेवरून न जाता खर्‍याला खरे म्हणण्याचे धैर्य लागते. ते धैर्य पतंगे सरांच्या लेखणीत आणि जीवनात आहे, हे नक्की! अंधारात दिप्तीमान व्हावे, तसे पतंगे सरांचे आत्मकथा नव्हे, विचारकथा असलेले हे पुस्तक. आज पतंगे सरांच्या जन्मदिनी त्यांच्यासोबतच त्यांच्या समरसतेचे अमृतगीत गाणार्‍या क्रांतिकारी ’मी, मनु आणि संघ’ पुस्तकालाही खूप खूप शुभेच्छा!
 
योगिता साळवी