आपली ध्वज संहिता (भाग- 2)

    दिनांक : 08-Aug-2022
Total Views |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहिता 2006 ची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा दुसरा भाग असा…
 

tiranga 
 
 
 
कलम एक : बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणत्याही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींना राष्ट्रध्वज लावण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. या अधिनियमाच्या तरतुदी विचारात घेता बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 चा भंग करून वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तूस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही. बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950, कलम 2 : या अधिनियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल, तर (क) ‘बोधचिन्ह’ याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिदिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 : त्या- त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहीत करील, अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीज करून एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार,व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शीर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हांत किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्ह म्हणून विर्निदिष्ट करण्यात आला आहे.
 
राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 च्या कलम 2 नुसार जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरूप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रुप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृती द्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्य दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.
 
स्पष्टीकरण एक ते तीन असे : कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. भारतीय राष्ट्रध्वज या शब्द प्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थांवर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. सार्वजनिक ठिकाण या शब्द प्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी हा हेतू असलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल, अशी कोणतीही जागा असा आहे. त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनांचा अंतर्भाव आहे.
 
ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो.त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल, अशा कोणत्याही स्वरूपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हात पुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. मात्र, विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. एखाद्या पुतळ्याच्या अनावरणप्रंसगी, ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल, अशा प्रकारे लावावा. त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा वक्त्याचा टेबल झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही. ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होवू देवू नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेवू नये. ध्वज मोटार वाहने, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमानाच्या झडपावर, छतावर, बाजूंवर किंवा पाठिमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. ध्वजाच्या एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल, अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
 
जनतेतील कोणतीही व्यक्ती, खासगी संघटना किंवा शैक्षणिक संस्थांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण करता येईल. राष्ट्रध्वज लावता येईल. ज्या- ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येवू नये. ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. ध्वज संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदींव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येवू नयेत. जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठिमागे वरच्या बाजूला लावावा. जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावा (म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा. राष्ट्रध्वज
या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाणे विनिर्देशांशी शक्य तेवढ्या प्रमाणात अनुरुप असावा. राष्ट्रध्वजापेक्षा ऊंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्याबरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये.
 
तसेच ज्या काठीवर ध्वज फडकवत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल. तथापि, असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खासगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही रीतीने तो लावू नये किंवा बांधू नये आणि जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल, अशा अन्य कोणत्याही पद्धतीने तो खासगीरीत्या संपूर्ण पणे नष्ट करावा.
 
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे