मुंबई : येत्या 48 तासात राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात सर्वीकडे जोरदार पावसाची शक्यता तसेच कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मान्सूनचं पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सारी बरसात आहेत. तर मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांमध्ये आणखी सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार बसरणार आहे.