आपली ध्वजसंहिता (भाग- 1)

    दिनांक : 04-Aug-2022
Total Views |
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहितेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा पहिला भाग असा…
 
 
Har Ghar TIranga
 
 
 
भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतिक आहे. हा तिरंगा गेल्या सात दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी सशस्त्र बलांच्या जवानांसह अनेक लोकांनी त्याचे रक्षण करण्याकरीता उदारपणाने आपले प्राण पणाला लावले आहेत. 
 
डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वजामधील रंगांच्या चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल विस्तृतपणे वर्णन केलेले होते. संविधान सभेने एकमताने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. डॉ. एस. राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले, की भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वत:ला वाहून घेतले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे, अशा वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे धर्म नियमांचे चक्र आहे जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत. तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. तेथे कुंठिततेत मृत्यू आहे. गतिमानतेत जीवन आहे. भारताने परिवर्तनाला कसलाही प्रतिरोध करू नये. त्याने गतिमान बनले पाहिजे व पुढे गेले पाहिजे. चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतिशिलतेचे निदर्शक आहे.
 
राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक प्रेम व आदर आहे आणि त्याच्याप्रती सर्वांची निष्ठा आहे. तरी सुद्धा राष्ट्रध्वज लागू करण्याकरीता लागू असलेले कायदे, प्रथा व संकेत यासंबंधात केवळ लोकांमध्येच नव्हे, तर शासकीय संघटना, अभिकरणे यामध्ये सुद्धा कित्येकदा जाणिवेचा स्पष्ट अभाव दिसून आलेला आहे. राष्ट्रध्वज लावण्याबाबत शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या असांविधिक सूचनांव्यतिरिक्त बोधचिन्हे, व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम (1950चा अधिनियम क्रमांक 12) आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम (1971 चा अधिनियम क्रमांक 69) यांच्या तरतुदीद्वारे राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केले जात आहे. सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनाखाली व हितासाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 मध्ये याबाबतचे सर्व कायदे, संकेत, प्रथा व सूचना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
 
सोयीसाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 ची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संहितेच्या भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश आहे. संहितेच्या भाग दोनमध्ये जनतेतील कोणतीही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था आदींना राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती दिली आहे. संहितेचा भाग तीन हा केंद्र सरकार व राज्य सरकारे आणि त्यांच्या संघटना व अभिकरणांनी राष्ट्रध्वज लावण्यासंबंधातील आहे.
 
भारतीय राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्यांचा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोडपट्ट्यांचा मिळून बनलेला असेल. सर्वांत वरची पट्टी केशरी रंगाची असेल, खालची पट्टी हिरव्या रंगाची, तर मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे (Navy Blue) अशोक चक्राचे चिन्हं असेल. अशोक चक्र हे विशेष करून स्क्रिन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले  किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्यरीतीने भरतकाम केलेले असेल आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी पूर्णत: दिसेल असे असेल. भारतीय राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असावा. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा आहे. ध्वजाची लांबी व उंची (रुंदी) यांचे प्रमाण 3:2 एवढे असावे.
 
राष्ट्रध्वजाचे प्रमाणित आकार असे आहेत.
 
 क्र. आकार (मि. मि.)
          1          6300 X 4200
 2 3600 X 2400
 3 2700 X 1800
 4 1800 X1200
 5 1350 X 900
 6 900 X 600
 7 450 X 300
 8 225 X 150
 9 150 X100
 
 
ध्वज लावण्यासाठी त्याचा योग्य तो आकार निवडणे आवश्यक आहे.
450 X300 मि. मि. आकाराचे ध्वज अति विशेष मान्यवर व्यक्तींच्या विमानांकरीता आहेत.
225 X150 मि. मि. आकाराचे ध्वज मोटारगाड्यांवर लावण्याकरीता आहेत.
150X100 मि. मि. आकाराचे ध्वज टेबलवर लावण्याकरीता आहेत.