मुंबई लोकलचा बदलता चेहरामोहरा....

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |
लोकल रेल्वे ही मुंबई महानगराची जीवनवाहिनी. पण, दुर्देवाने या रेल्वेसेवेकडे, प्रवाशांच्या सेवासुविधांकडे कानाडोळाच केला गेला. परंतु, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून एकूणच भारतीय रेल्वेचे स्वरुप पालटले आहे. आज मुंबईतही बहुतांश रेल्वे स्थानकांवर कोणते ना कोणते काम सुरु दिसते, तर अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अशा बर्‍याच रेल्वे स्थानकांचा गेल्या काही वर्षांत पूर्णत: कायापालट झाला आहे. त्यानिमित्ताने मुंबई लोकलचा बदलता चेहरामोहरा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 

lokal 
 
 
 
 
मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेसेवा सुरू होऊन आता 169 वर्षे पूर्ण झाली. जगभरात इतक्या धडाकीने व कित्येक लाख लोकांना शहरात अशी सेवा देण्याचा भारतीय रेल्वेने एक विक्रमच निर्माण केला आहे. या सेवांकरिता रेल्वेचा पश्चिम रेल्वे विभाग व मध्य रेल्वे विभाग अजून भिन्न ठेवला गेला आहे. कोलकाता व चेन्नई येथे उपनगरीय रेल्वे सेवा मात्र एकाच विभागाखाली कार्यरत आहेत. मुंबईतही हे दोन्ही विभाग झाले, तर प्रवाशांना सोयीसुविधा देणे रेल्वेसाठी नक्कीच किफायतशीर ठरेल. 
 
मध्य रेल्वेच्या हार्बर सेवेने मुंबईहून नवी मुंबई वाशीपर्यंत दि. 9 मे, 1992 ला रेल्वेसेवा सुरू केली. तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरमन यांनी त्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केले होते. छशिमट ते वाशी रेल्वे प्रवासाला साधारण 1 तास, 20 मिनिटे लागतात. आता हार्बर रेल्वेचा पनवेलपर्यंत मोठा विस्तार झाला असून दि. 9 मे रोजी त्याही घटनेला 30 वर्षे पूर्ण झाली.कोरोना काळ आता संपत आला आहे, असे जरी सरकारने जाहीर केले नसले तरी त्यापासूनचा धोका पुष्कळ कमी झाला आहे. म्हणूनच रेल्वेने मुंबईसह देशभरात त्यांच्या कामांचा धडाका लावला आहे.
 
रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून एप्रिलमध्ये एक हजार कोटींचा निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील (एमयुटीपी) रखडलेली कामे आता सुरू होतील. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दि. 13 एप्रिल रोजी यासंदर्भात एत बैठकही पार पडली होती. तेव्हा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
मुंबईतील रेल्वेकामांची गती
 
छशिमट ते गोरेगाव हा हार्बर मार्गावरील रेल्वेप्रवास आता अधिक वेगवान स्वरुपात होणार आहे. गोरेगाव ते माहिम या वळणाच्या प्रवासातील त्रासाची तीव्रता आता कमी करण्यात रेल्वेला यश लाभले आहे. त्यामुळे यापुढे या मार्गावर वक्तशीरपणे 112 लोकल फेर्‍या धावतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. माहिमजवळील वळणामुळे रेल्वेच्या वेगाची मर्यादा ताशी 30 किमीपर्यंतच होत होती. पण, आता माहिम स्थानकादरम्यान अंतिम टप्प्यातील काही कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर येथील वेगमर्यादा 30 किमी होती, ती 50 किमीपर्यंत वाढू शकेल. त्यामुळे हार्बर रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या प्रवास वेळेत पाच ते दहा मिनिटांचा फरक पडेल.
 
पश्चिम रेल्वेने देखील महिला स्पेशल गाडी प्रथमच दि. 5 मे, 1992 ला सुरू केली होती. त्या घटनेलाही आता 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट-बोरिवली महिला स्पेशल गाडी विरारपर्यंत 1993 मध्ये सुरू झाली. सध्या अशा दहा महिला स्पेशल गाड्या पश्चिम रेल्वेमार्गावर धावत असल्या तरी वाढती लोकसंख्या आणि महिलांच्या मागणीनुसार या फेर्‍यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. दि. 1 जुलै, 1992 पासून मध्य रेल्वेने सुद्धा महिला स्पेशल गाड्या सुरू केल्या होत्या.
रेल्वेमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, 48 रेल्वे गाड्यांमधील 189 डब्यांमध्ये एकूण 1,397 ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ प्रशासनाने बसवले आहेत. शिवाय 189 डब्यांपैकी 140 डबे हे महिलांकरिता खास डिझाईनही करण्यात आले आहेत. स्त्रीस्नेही होण्यासाठी महिला लोकलकरिता अधिक डबे, अधिक-स्वच्छता आणि पाळणा घराच्या मागणीचा विचार करणार असल्याचेही समजते. पश्चिम रेल्वेने बोरिवली-विरार या नव्या पाचव्या व सहाव्या मार्गिकांचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पास 2,184 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण-काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाचे प्रस्ताव मुंबई, ठाणे, पालघर जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत. मार्गिकेत पादचारपूल, भुयारी मार्गाची कामे आहेत. याच सुमारास मुंबई सेंट्रल ते बोरिवली-विरार पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम प्रतीक्षेत आहे. वांद्रे ते खार जुना पूल पाडून नवा बांधायचा विचार आहे.
 
मुंबई-उरण मार्गाचे काम जवळ जवळ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. 14.6 किमी लांब मार्ग प्रकल्प 3,970 कोटी रुपये खर्चाचा आहे व हे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबईहून 27 किमीच्या मार्गापैकी 12.4 किमी मार्ग नोव्हेंबर 2018 मध्ये पूर्ण झाला होता. काम पूर्ण झाल्यानंतर दर दहा मिनिटांनी उरण लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वे 15 डब्यांच्या लोकलच्या 27 फेर्‍या वाढविणार आहे. अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेच्या फेर्‍या आणि डब्यांची संख्या वाढविणे सुद्धा गरजेचे आहे.सुरक्षित प्रवासासाठी पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार 44 पोलादी गर्डरऐवजी ते काँक्रिटचे बसविणार आहे. त्यामुळे ते गर्डर टिकावू व गंज प्रतिबंधित राहतील.’मेक इन इंडिया’मधून अत्याधुनिक ‘सीबीटीसी’ सिग्नल यंत्रणा उभारली जाणार आहे. शिवाय 238 वातानुकूलित लोकल खरेदी करण्यासाठी खासगी बँकेकडून सात हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घेतले जाणार आहे. मध्य रेल्वे छशिमट ते कल्याण, हार्बरवर छशिमट ते पनवेल व पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारला ही सुधारित सिग्नल यंत्रणा वापरली जाणार आहे.
‘सीबीटीसी’ यंत्रणा पूर्णपणे ‘डिजिटल’ आहे. यात मोटरमनला बसल्याजागी वेगासंदर्भत नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतात व पुढे धावणार्‍या लोकलसंबंधीही सूचना मिळते. यामुळे लोकल वेळेत व जास्त संख्येने धावतील. चार मिनिटाऐवजी त्यांची वारंवारता दोन मिनिटांवर येऊ शकेल. तसेच दि. 27 ऑगस्टपासून कोकणच्या ‘तुतारी एक्सप्रेस’ला 19 डब्यांच्या जागी 24 डबे लावले जाणार आहेत.
 
मुंबईकरांचा ‘स्मार्ट’ लोकल प्रवास
 
लोकलच्या वातानुकूलित डब्यांमध्ये वातावरण नियंत्रित करण्याची साधने वापरण्यात येणार आहेत. वीजबचतीचा पर्यायही यामध्ये उपलब्ध असेल. स्टील-अ‍ॅल्युमिनियमऐवजी लाकडी फायबरची आसने बसविली जाणार आहेत. मेधाभेलसह बंबार्डियर, ऑलस्टॉप, हिताची, सीमेन्स इत्यादी नऊ कंपन्यानी लोकल सुधारित बांधणीची तयारी दर्शविली आहे.

रेल्वे मार्गावरील अतिक्रमणे हटविणार
 
मुंबईतील एकूण 57 हेक्टर रेल्वे क्षेत्रात सुमारे 27 हजार झोपड्यांचे अतिक्रमण असल्याची नोंद आहे. तसेच रेल्वेरुळांलगत राहणार्‍या नागरिकांच्या जीवालाही धोका असतो. स्थानकावरील खिसेकापूंवर व ट्रॅकवर मार्शलकडून नजर ठेवली जाणार व फुकट्या प्रवाशाना बडगा दाखविणार. वरील कामांव्यतिरिक्त विविध स्थानकांवर सोयीसुविधा व सुधारणाही प्रगतीपथावर आहेत.
 
मुंबई महानगर क्षेत्रातील मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थानकांबाहेरील (सुमारे 40 स्थानके) मोकळ्या जागांचे सुशोभीकरण (बगीचा व झाडे लावणे) करण्याचाही रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. रुळांजवळच्या टाकलेल्या कचर्‍यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते. तिथेही साफसफाईकडे आवर्जून लक्ष दिले जाणार आहे. यासाठीचे कंत्राट खासगी संस्था व सामाजिक संस्था यांना दिले जाईल. सर्व पादचारी पूल दुरूस्त करून एकमेकांना जोडणे, नवीन फलाटांची उभारणी, जुन्या फलाटांचा विस्तार, सरकते जिने, उद्वाहक, नवीन इंडिकेटर इत्यादी बसविले जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारने 332 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.भायखळा रेल्वे स्थानकाला 169 वर्षांपूर्वीची म्हणजे 1853ची झळाळी आणून तेथे सुशोभनीकरण करण्यात आले आहे, जोगेश्वरी टर्मिनस स्थानक परिसर फेरीवालामुक्त करणार; ठाणे स्थानक सॅटिसच्या साहाय्याने तेथील दमछाक, चेंगराचेंगरी कमी करणार; चर्चगेट स्थानकावर जास्ती वेगाचे फॅन बसविणार, पदपथांचा कायापालट करणार व सुरक्षा वाढविणार. ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाला नवे रुप, नवीन इमारती, पंचतारांकित हॉटेल असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील विविध स्थानकांवर ‘वायफाय’, विनाइंटरनेट मनोरंजन सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.
 
80 कोटींच्या तरतुदीने ‘आरपीएफ’ ‘सीसीटीव्ही’च्या टप्प्यात आणणार असून त्यात 24 ठाणी आहेत. सरकते जिने (एस्कलेटर) लिफ्ट, ‘सीसीटीव्ही’ नवीन 263 ‘एटीव्हीएम’ मशीन सुरु करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील 24 स्थानकांवर वैद्यकीय मदतकक्ष उभे राहणार असून 81 रेल्वे स्थानकांवर सुरक्षेकरिता व्हिडिओ निरीक्षणाची व्यवस्था करणार येणार आहे. जुलै महिन्यापासून मध्य रेल्वेकरिता ट्रॅक शोधणारा ‘अ‍ॅलर्ट’ , कल्याण स्थानकावर ‘इलेक्ट्रिकल चार्जिंग’ची सोय, 34 स्थानकांत ‘वॉटर व्हेंडिंग’ मशीन घेऊन स्वस्त पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छशिमटला विमानतळाप्रमाणे सुखसुविधा (शेविंग, फेशल, हेअरकट, स्किन ट्रिटमेंट, पेडीक्युअर, स्पा इत्यादी सेवा 24 तासांंकरिता पुरविणार. मॅजिक मिरर बसवून करमणूक करणार). दादर रेल्वे स्थानकावरच्या फलाटावर गुन्हा व गर्दी कमी होण्यासाठी ‘वॉचटॉवर’ बसविणार असून येथे या कामाला यश मिळाल्यावर कुर्ला इत्यादी स्थानकावर ‘वॉचटॉवर’उभारले जातील. तसेच वांद्रे टर्मिनस ते खारचा ‘स्कायवॉक’ही खुला करण्यात आला आहे.
 
रेल्वे स्थानकात वीज आणि प्रदूषणमुक्त प्रवास करण्यासाठी ‘हेड ऑन जनरेशन’ (एचओजी) तंत्रज्ञान वापरात येणार असून त्यामुळे विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या प्रगतीसाठी सर्वंकष प्रयत्न सुरु असून आगामी काळात या संपूर्ण नेटवर्कचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल.
 
अच्युत राईलकर