जाणून घ्या : कोणत्या जिल्ह्यांना होईल फायदा
जळगाव : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकआनंदाची बातमी समोर आली आहे. यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय 30 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आला आहे.
जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागांत मोठ्या प्रमाणात शेतीतील (Agriculture) पिकांचे नुकसान झाले होते. याच नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदतीचे वाटप देखील करण्यात आले होते. मात्र या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत नुकसानग्रस्त जळगाव जिल्हा होता. आता या जिल्ह्याला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी 35.31 कोटी निधी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 35.31 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना
अतिवृष्टी किंवा महापुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सरकारकडून ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक पोकळी भरून निघावी हाच मुख्य उद्देश आहे. यामुळे देशातील कित्येक शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई म्हणून मिळालेली आर्थिक मदत दिलासादायक ठरते.