२९३६ विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई; १७ लाखांहून अधिक महसूल जमा
जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सहा ते सात मुख्य स्थानकावर विनातिकीट प्रवासी तपासणी धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेदरम्यान आढळून आलेल्या तब्बल दोन हजार ९३६ विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईव्दारे १७ लाख ८३ हजार ७८६ रूपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
भुसावळ मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मेल एक्सप्रेस पॅसेंजरसाठी गेल्या दोन महीन्यापासून मासिक पास तसेच सर्वसाधारण तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. बरेचसे नोकरदार विद्यार्थी मासिक, त्रैमासिक सवलतीच्या पासव्दारे तसेच सर्वसाधारण तिकीटांव्दारे प्रवास करीत आहेत. असे असले तरी प्रवाशांची गर्दी पहाता बरेचसे प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे भुसावळ विभागांतर्गत शनिवारी दिवसभर भुसावळ, नाशिक, मनमाड, खंडवा आणि अकोला या जंक्शन स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांविरूद्ध तिकीट तपासणी धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत भुसावळ स्थानकावर डिआरएम, एडीआरएम, मुख्य तिकीट निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे १५६ तिकीट तपासणीस, ६३ अन्य कर्मचारी तसेच ४८ आरपीएफ असे २६७ कर्मचार्यांचे ४० पथके तैनात करण्यात आली.
भुसावळ रेल्वे स्थानकावर २७ ऑगस्ट रोजी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाणिज्य विभागातील ४० रेल्वे कर्मचार्यांचा सहभाग होता. प्रवाशांनी इच्छित ठिकाणी जाण्याच्या प्रवासाचे योग्य तिकीट काढून प्रवास करावा व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ