वन्यप्राणी शिकार आणि तस्करी प्रकरणी जळगावातील तीन जणांना अटक

    दिनांक : 24-Aug-2022
Total Views |
तीन दिवसांची वनकोठडी : वनविभागाची कारवाई

जळगाव : वन्यजीव शिकार तसेच तस्करी प्रकरणी भवानीपेठ परिसरातील डॉ. अजय कोगटा, चुनीलाल पवार आणि लक्ष्मीकांत मन्यार या तिघांना अटक करण्यात आली. जळगाव वनविभागाकडून कारवाई करण्यात आली असून तिघांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍यांनी दिली.
 
JAL 
 
वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव शहरातील भवानी पेठेतील मे. रामनाथ मूलचंद कोगटा या दुकानावर वनविभागाने छापा टाकला. यात ११ हताजोडी, ११ रानमांजर रंजनी, २६० सियारसिंगी, १ कासवपाठ, ३८ इंद्रजाल, नागाचे २१ मणके, घुबडाची ३ नखे, २ समुद्रघोडा असा वन्यजीव अवशेष मुद्देमाल आढळून आला. वनविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईनुसार भवानीपेठ येथील डॉ. अजय लक्ष्मीनारायण, चुनीलाल नंदलाल पवार. रा.खेडगाव तांडा, ता.एरंडोल, लक्ष्मीकांत रामलाल मन्यार या तिघां संशयीत आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
 
वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत वन्य जीव प्राणी शिकार वा तस्करी प्रकरणी ७ वर्षे कारावास शिक्षेची तरतूद आहे.
 
सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, दत्तात्रय लोंढे, वनपाल संदीप पाटील, योगेश दीक्षित, वनरक्षक उल्हास पाटील, प्रशांत सोनवणे, जितेंद्र चिंचोले, अजय रायसिंग, संभाजी पाटील, वाहन चालक ज्ञानेश्वर पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
 
पुढील तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करत आहेत.