एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत 'या' केल्यात मागण्या...

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |
मुंबई : राहूरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खान्देश परिसरात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत सोमवारी कामाकाजा दरम्यान केली. अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांच्या विषयावर खान्देशातील विविध प्रलंबित विषयांकडे खडसे यांनी शासनाचे लक्ष वेधले.
 


eknath_khadse1 
 
विद्यापीठ उत्तर महाराष्ट्रात जळगाव व धुळे जिल्ह्यात कोठेही झाले तरी चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित करुन कृषी महाविद्यालयासाठी प्रलंबित पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, तेथील अन्य कामांना मदत मिळावी, असे ते म्हणाले.
 
एसआरपी केंद्र व्हावे
 
१९९९ मध्ये जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी १०६ एकर जागेचे आरक्षणही करण्यात आले. मात्र नंतर हे प्रशिक्षण केंद्र जामखेला गेले. या ठिकाणी एस.आर.पी. प्रशिक्षण केंद्र केले जाईल असे आश्वासन मिळाले होते. मात्र तेदेखील अद्याप झाले नाही. हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय असल्याचे ते म्हणाले. लंपी आजारामुळे जळगाव जिल्ह्यात अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली. जिल्ह्यातील भडगाव, रावेर, मुक्ताईनगरसह अन्य तालुक्यातील जनावरांना या रोगाची लागण होऊन अनेक गुरू दगावली. यामुळे पशुपालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातही ही स्थिती असल्याने तात्काळ अनुदान मिळावे व त्यासाठी निधीची तरतूद केली जावी अशीही मागणी खडसे यांनी केली. राज्यात भूमि अभिलेख कार्यालयात पदे रिक्त आहेत. शेत मोजणीच्या कामांना विलंब होतो. या कार्यालयांमधील पदे तात्काळ भरली जावीत, तसेच प्लॉट तुकडे बंदीचा निर्णय मागे घेतला जावा यासह विविध मागण्या त्यांनी विधान परिषदेत केल्या.