घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच थेट जनतेतून सरपंचाच्या निवडीस ‘मविआ’चा विरोध!

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |
भाजप जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांचा आरोप

जळगाव : नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि तसेच ग्रामपंचायतीत थेट सर्वसामान्य जनतेतून सरपंचांची निवड करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. तो निर्णय लोकशाहीला बळकटी देणारा असून घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सर्वसामान्य जनतेतून थेट सरपंच निवडीला मविआ कडून विरोध केला जात असल्याचा आरोप आ. सुरेश भोळे यांनी केला आहे.


MLA Suresh Bhole1 
 
सर्वसामान्य जनतेतून सरपंच नगराध्यक्ष निवडीच्या घेतलेल्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास राजकारणातील ठरावीक घराण्यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात येईल, या भीतीमुळेच विरोधकांकडून निर्णयास विरोध सुरू केला आहे. असे असले तरी, या निर्णयामुळे जनतेच्या भावनांचा शिंदे-फडणवीस सरकारने आदर केला आहे अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 
सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे, असे आ सुरेश भोळे म्हणाले. सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच रहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप-शिवसेना सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेचा मुहूर्त महाराष्ट्रातून होत असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी समाधान व्यक्त केले. असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.