ऊन सावली
'काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी...'
जीवनाचं मूर्तिमंत प्रतीक असणारी यमुना. आनंद... हर्ष...
मिलन-विरह... दुःखाचं प्रतीक. यमुनेचा गूढ डोह कविमनाला का आकर्षित करतो...
बालकवी (Balkavi) असेच गूढ... तळ न सापडणार्या खोल डोहासारखे... तळही नाही आणि तरंगही नाही हाती येत... मग आपणच झोकून द्यायचं... आकंठ बुडायचं... अज्ञाताचा... अनंताचा वेध घेणारे बालकवी... प्रत्येक वेळी वेगळे भासतात
तरीही... ते हाती गवसतील तर शप्पथ!
'ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
पायवाट पांढरी तयातुनि आडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुनी चालली काळ्या डोहाकडे...
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर...'
एक सुरेख समृद्ध... प्रसन्न करणारं हे चित्रकाव्य अचानक शेवटच्या दोन ओळींनी गंभीर गूढ... ओढ लावणारं, हुरहुर घेऊन येणार बनतं.. जीवनाची ही आडवीतिडवी वाट खरी तर आसक्तीची! गुंतवत जाणारी... गुंतवून ठेवणारी. चार घरांच्या गावाकडे जाता जाता जळ गोड काळिमेकडे कशी अचानक खेचून नेते. ऐलतट आणि पैलतट. पैलथडीकडे जाणारी वाट ही विरक्तीची... पण इथंही ती... ओढाळ... आसक्ती... सारं जीवन लपेटून टाकणारी. औदुंबर... दत्तात्रेयांचा वास असणारं झाड... परीक्षा सत्त्व तपासायला आलेल्या तीन यतींना बालक बनवून पान्हा देणारी माता आसक्तीतून विरक्तीकडे न जाता निरागसतेकडे नेते. पैलतटावरही हा असा औदुंबर हिरवागार त्यावर लगडलेली भगवी उंबरं...! पैलतटावर खरं तर हा विरक्त हवा, पण सळसळ गूढ... खोल असणार्या डोहात पाय टाकून जीवनाचा आनंद घेणारा औदुंबर... जळ गोड काळिमात लपेटून गेलेला संन्यस्त औदुंबर...
आशालता वाबगावकर यांनी गायलेली किंचित वरच्या पट्टीतली ही कविता...
'गर्द सभोती रान साजणी तू तर चाफे कळी
काय हरविले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी'
पुढे वसंत कानिटकरांनी ही कविता 'मत्स्यगंधा' नाटकात घेतली.
सातवी-आठवीत आम्हाला 'औदुंबर' होती. (Balkavi) बालकवी शिकविताना त्यांच्या आठ-दहा तरी कविता माळी सर शिकवायचेच. त्यात या कवितेची त्यांनी इतकी विविध माहिती दिली. कदाचित बालकवींना या विषयावर खंड काव्य लिहायचं असावं. ही कविता अपूर्ण आहे. मी ती खूप प्रयत्न करून पूर्ण करण्याचा प'यत्न केला. पण बालकवींच्या माधुर्याची रंग, आस्वादाची काही सर येईना. श्याम भटाची 'तट्टाणी'च काय गर्दभीचीसुद्धा सर नाही आली. असे (Balkavi) बालकवी त्यांंच्या या टोपणनावामुळे बहुतेकांनी त्यांना लहान मुलांचे कवी ठरवून टाकले. बालकवींना निसर्ग उमजला होता. निसर्गातील अनेक गूढ त्यांच्या रंगाच्या काव्य लेपनाने अधिक गूढ बनली.
कोठून येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला...
एकीकडे निसर्गातली 'आनंदी'वृत्ती. सर्वत्र आनंदी आनंद व्यक्त होत असताना अंतर्मनात मात्र उदासीनता भरून येत आहे. जीवनातलं हे द्वंद्व त्यांच्या बहुतांशी कवितांतून व्यक्त होताना दिसते.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे.
आधीचा आषाढ धो-धो कोसळणारा. अंतर्बाह्य ढवळून काढणारा. त्या संततधारा... (Balkavi) थोडीशीही ऊन नाही. ओलाव्यातसुद्धा ऊन नसेल तर तो ओलावा कसला...? इथे तर सतत सारं सारं धुवून, वाहून नेणार्या धारा ओलाव्याविना कोसळणार्या... आणि अशात श्रावण येतो. तो मनात असतोच डोकावून पाहात, सुस्नात बालिकेसारखा. गवतागवतांतून, पानापानांतून फुलाकळ्यांमधून ऊन-सावल्यांच्या प्रसन्न कवडशांमधून गाणार्या पक्षिकुजनांतून... सर्वत्र आनंदी आनंद...
मोद विहरतो चोहीकडे
आनंदी आनंद गडे...
अशा आकंठ बुडलेल्या आनंदात श्रावण आपल्याला निसर्गाचं अद्भुत दर्शन घडवितो. बालकवींच्या नजरेतून निसर्गाचा विस्तीर्ण पट सुटत नाही. तपशिलामागची प्रसन्न दैवी रंगांची उधळण. काल नकोशी झालेली ती पावसाची झड... रिप... रिप... संततधार... अविरत कोसळणारी...
उदासीनता हृदयाच्या हृदयाला ग्रासणारी आता... क्षणात येणार्या सर सर शिरव्यातून अंगभर शहारून मनाला उभारी देते. हा ऊन-पावसाचा खेळ जीवनाला, मनाला एक नवं हर्ष- आनंदाचं- उल्हासाचं क्षितिज बहाल करतो. बिंदूतून विस्तारणारं अनंत
आशा प्रफुल्लित करणारं...
बलाकमाला उडता भासे
कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती
ग'हगोलचि की एकमते...
आणि मग आठवते... उदास... उदास... वाटू लागते. हे बगळे पांढरे शुभ'... स्वच्छ... कुठे अज्ञाताकडे जातात...
क्षणात येते सर सर शिरवे...
बालकवी आपल्याला कुठे घेऊन जातात... अज्ञात विश्वात गूढ... एकांती असणारे ग्रहगोलच बगळ्यांच्या रूपाने पृथ्वीवर... मनाच्या अंगणात अवतरतात... अशा प्रसन्न वातावरणातून परत त्या जळ गोड काळिमा असलेल्या (Balkavi) काळ्या-निळ्या डोहाकडे जाता जाता या सार्या आनंदी श्रावणमासी वातावरणातूनही मोहात न गुंतता तो एकांती निरस गीत गातो... पडक्या उद्ध्वस्त धर्मशाळेच्या वाळलेल्या शेवाळी कौलारावर पारवा गीत गातो...
भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न निरस एकांत गीत गातो
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आत अखंडित
दुःखनिद'ा आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बारे
सारा निसर्ग आनंदानं डोलताना, हर्षोल्हासाचा वर्षाव होत असताना ही पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा त्या टेकडीपलीकडच्या टुमदार चार घरांच्या गावाकडे जाता जाता खरं तर हिरव्यागार कुरणांच्या मधून लाल मातीच्या वाटेची आठवण येते, पण इथं ही 'पांढरी वाट' अवतरते आणि या 'मोद विहरतो चोहीकडे' वातावरणात पडकी- खचलेली धर्मशाळा अवतरते. (Balkavi) प्रवासात साथसंगत करणारी अल्पसा एखादी रात्र विसावा देणारी धर्मशाळाही उद्ध्वस्त झालीय. भिंत खचून खांब कलथून गेलाय्... रंग उडून गेलेल्या भिंती... आणि ती फुलराणी... कुठं गेली...? 'ती वनमाला म्हणे नृपाला हे तर माझे घर...' कुठं गेलं ते घर... कुठं गेली ती वनमाला... गर्द सभोतीचं हिरवंगार रान... हरवलंय्...
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची...
कुंतीनं... का बरं त्रिवार दुःख मागितलं... तेच तर तिचं पूर्व संचित भागदेय होतं. बालकवींचं दुःख हे हिरव्यागार हिरवळीखाली लपलेल्या अणुकुचीदार काट्यासारखे... राखेच्या आवरणात लपलेल्या सुप्त-तप्त निखार्यासारखे... चीरदाही... सतत सलणारे... ऐन भरात तारुण्यात संध्या गीत गाणारे...
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे...
तुला त्याचे भानही नसे बारे...
जगाला विसरून खिन्न गीत गाणारा पारवा... उडत उडत आला तर खचलेली भिंत... वाळलेलं गवत निर्मनुष्य वळचणीचा चिवचिवाट हा नि:शब्द झालेला. या वाटेने कितीदा गेलो... विसाव्याला थांबलो... हे असं कसं हे विश्व... 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे...' धगींचा निखारा आग. अरे तू गीत गातोयस खिन्न... तुला माझ्या विश्वातल्या उष्ण वार्यांची झळ नाही जाणवली... मी ही तुझ्यासारखाच बा रे... खिन्न उदास... एकाकी...
शांती दाटली चोहीकडे
कुणी नाही गं कुणी नाही
आम्हाला पाहत बाई...
शांत... अंधार... आता पाहणारेही कुणी नाही. तो पारवा... तोही आता खिन्नपणे गीत गातोय... आणि तो पाय टाकूनी जळात बसलेला... 'असला' औदुंबर. आनंदाच्या वर्षावात झरझर झरणार्या हृदय वेदनेच्या धारा... कोसळणारे जीवन बालकवी हेलावून सोडतात. काव्याच्या नभांगणात उंच एकाकी विहरणार्या या विहंगाच्या शोधात खूप हिंडलो.
धरणगावला गेलो.. कवींचं गाव... (Balkavi) बालकवींचं गाव... दुर्गादास आत्माराम तिवारींचं गाव... (Balkavi) कवी प्रकाश किनगावकरांच्या बरोबर एका बांधिव चुन्याच्या लिंपणाचं नक्षिकाम असलेली विहीर, मोठी चौकोनी ओवप्या असलेली. त्याच्या पलीकडून एकेकाळी दुथडी भरून वाहणारा झरा आता कोरडा पडलेला आणि त्याच्या काठावरचा तो जलहीन डोहात पाय सोडून बसलेला पाण्याची वाट पाहणारा औदुंबर...! त्या विहिरीतल्या एकाकी ओवप्यात आता कोपर्याकोपर्यात पारवे खिन्न गीत गात होते... त्यात ठोंबरे होते... शिरवाडकर... खानोलकर... गोडघाटे... पटवर्धन... यशवंत... इंदिरा... शांताबाई... कोण कोण सारेच त्या उद्ध्वस्त धर्मशाळेच्या आडोशाला आलेले...
भिंत खचली कलथून खांब गेला...
- गिरीश प्रभुणे